Breaking News

सौदेबाजीमुळे राफेल करार खोळंबला का? मोदी यांचा राहुल गांधींना खोचक सवाल; मिशेलचा संदर्भही जोडला


सोलापूर/ प्रतिनिधीः
ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल हा राफेल करारातही सौदेबाजी करत होता असे वाचनात आले. या मिशेलमामाच्या सौदेबाजीमुळेच काँग्रेस सरकारच्या काळात राफेल करार खोळंबला होता का?, असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना विचारला. विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आणि लोकार्पणासाठी आलेल्या मोदी यांनी तत्कालीन काँग्रेस सरकार आणि गांधी कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले. मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. आई तुळजाभवानी, पंढरपूर येथील पांडुरंग- रुक्मिणी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, मंगळवेढ्याचे दामाजीपंत यांना नतमस्तक होऊन तसेच हुतात्म्यांना अभिवादन करत, मला सोलापूरकरांनी आजवर जे प्रेम आणि आशीर्वाद दिले ते कायम ठेवावेत असे म्हटले. समारोपही त्यांनी मराठी तसेच कन्नड भाषेतून केला. 2004 ते 2014 या काळात दिल्लीत रिमोट कंट्रोलचे सरकार सत्तेवर होते. या 10 वर्षांत या सरकारने गरीबांसाठी काहीच काम केले नाही. त्यांनी शहरातील गरीबांसाठी 10 वर्षांत 8 लाख घरे बांधली. एवढ्या मोठ्या देशात एका वर्षाला फक्त 80 हजार घरे बांधली; पण भाजप सरकारने 4 वर्षांतच 14 लाख घरे बांधल्याचे त्यांनी सांगितले. 


राफेल करारावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘चौकीदार चोेर है’, असे सांगत राहुल गांधी हे थेट मोदींना लक्ष्य करत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूरमधील सभेत मोदी यांनी ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यावरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर पलटवार केला. मोदी म्हणाले, की मी वर्तमानपत्रात वाचले होते, की हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलालाला परदेशातून भारतात आणण्यात आले. तो दलाल फक्त हेलिकॉप्टर घोटाळ्यात नव्हता, तर यापूर्वीच्या सरकारच्या काळात फ्रान्ससोबत ज्या राफेल कराराची चर्चा सुरू होती, त्या करारातही हा दलाल सौदेबाजी करत होता. या दलालामुळेच यूपीएच्या काळात राफेल करार खोळंबला का?, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आता तपास यंत्रणा शोधत आहेत. देशातील जनताही याचे उत्तर मागत आहे. या दलालांमध्ये त्यांचा एक शुभचिंतकही आहे. देशाच्या सुरक्षेचा त्यांनी जो खेळ मांडला त्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल.

जे लोक सत्तेला आपला जन्मसिद्ध अधिकार समजत होते, आता त्याच लोकांना कर बुडवल्यापासून ते संरक्षण करारातील लाचखोरीवर उत्तर द्यावे लागत आहे. चोरी करणारे आणि लुटणार्‍यांचे दुकान बंद करण्यात आले. आता गरीबांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होत आहे, असा दावा मोदी यांनी केला. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकताच दिल्ली न्यायालयात केला होता. या पार्श्‍वभूमीवर मोदींनी मिशेलचा उल्लेख मिशेलमामा असा करत गांधी कुटुंबाला चिमटा काढला आहे.

व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार शरद बनसोडे, माकपाचे माजी आमदार नरसय्या आडम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित जनतेतून मोदी-मोदी असा गजर झाला.

दलालमुक्त भारत करणार

मताच्या राजकारणासाठी जातीय आरक्षणाचे आतापर्यंत राजकारण झाले. भाजपा सरकारने कधीही अशा प्रकारचे राजकारण केले नाही. ‘सबका साथ, सबका विकास’ हे आमच्यावर संस्कार आहेत, आमची संस्कृती, आमची परंपरा आहे. आधीच्या सरकारला गरिबांची चिंता नव्हती. 30 हजार घरांच्या सोलापुरातील प्रकल्पाचा शीलान्यास केला आहे. आता याच्या उद्घाटनालाही मीच येईल असा दावा करून देश दलालमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.