Breaking News

पाथर्डीचा तरुण करणार पंकजा मुडेेंच्या कार्यालयात आत्महत्या


अहमदनगर/प्रतिनिधी
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील आश्‍वासनपुर्ती करण्यासाठी पाथर्डीतील एक तरुण ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे मंत्रालयात गेला होता. तेथे निधी मंजूर होण्यासाठी चक्क त्याच्याकडे 20 टक्क्याने पैशाची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती 10 टक्के देण्याचे ठरले असता त्याने चार लाख रुपये मोजले. मात्र, एकाही यादीत गावाचे नाव आले नाही. मुंडे यांचा पीए म्हणून ज्याने ही रक्कम बळकावली, त्याला विचारणा केली असता केवळ उडवाउडविचीच उत्तरे मिळाली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. निधी नको, पण पैसे परत द्या. अशी मागणी केली असता त्यास पिस्तुलचा धाक दाखवून ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे वैतागलेल्या तरुणने कठोर निर्णय घेतला आहे. जर दोन दिवसात चार लाख दिले नाही. तर, पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात आत्महत्या करणार आहे. असे दहिफळे याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

दहिफळे हा पाथर्डी तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार आहे. मात्र, गावाचा विकास झाला पाहीजे, यासाठी तो धडपड करत असतो. गेल्या निवडणुकीत त्याच्या गावात त्याने भाजपची सत्ता आणली. दरम्यान सरपंचांनी ग्रामस्थांना विकासाचे आश्‍वासन दिले होते. ते पुर्णत्वास जावे म्हणून 50 लाखांच्या कामांचा अहवाल घेऊन निधीसाठी त्याने थेट मंत्रायल गाठले. तेथे मुंडे यांच्या कार्यालयात धनराज यांची भेट झाली. मी पंकजाताईंचा पीए आहे. कोणत्याही कामास मंजुरी हवी असेल तर त्यासाठी 20 टक्के आम्हाला द्यावे लागतात. त्यात मंत्र्यांसह पीएस, ओएसडी यांच्यासह अन्य जणांना रक्कम अदा करावी लागते. असे होत नसेल तर कोणत्याही कामांना मंजुरी मिळणार नाही. दरम्यान आकाशवाणी निवास केंद्र येथे धनराज यांनी 20 टक्के रकमेची मागणी केली. तडजोडीअंती 10 टक्के रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार एक लाख रुपये धनराज यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. तर एक लाख रुपये पंकजाताईंच्या केबीनच्या बाजुला जाऊन दिले. तर विनोद तावडे यांच्या कार्यालयात देखील अशीच टक्केवारी सुरू आहे. तेथून देखील मस्जिद, स्मशानभूमी व अन्य कामांसाठी निधी मिळू शकतो. असे म्हणून दोन लाख घेतले. मात्र, शासनाकडून कामांच्या निधीची यादी बाहेर पडली, त्यात मात्र, गावाचे नाव नव्हते. दुसर्‍या यादीची प्रतिक्षा करुन देखील त्यातही नाव नव्हते. त्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार तरुणाच्या लक्षात आला. त्याने धनराज याला विचारणा केली असता त्याने सांगितले, 20 टक्के रक्कम दिली तरच निधी मंजूर होईल. त्याच्या उत्तरानंतर दहिफळे यांनी निधी नाकारुन दिलेल्या पैशांची मागणी केली. मात्र, त्यास शिवीगाळ, दमदाटी व धमकी सोडून हाती काहीच आले नाही. त्यामुळे त्याने घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
दरम्यान या घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. निधी मिळविण्यासाठी अशा पद्धतीने टक्केवारी घेतली जाते हे गुपीत होते. मात्र, मंत्रालयातील कारभारासह भाजपचा कारभार देखील चव्हाट्यावर आला आहे.


मुंडेताई पुन्हा अडचणीत
पाथर्डीतील तरुणाने व्हिडीओच्या माध्यमातून जो आरोप केला आहे. त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. जर त्यात सत्यता असेल तर, भाजप सरकारच्या कारभारावर मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण होणार आहे. या तरुणाकडे सर्व पुरावे असून दोन वर्षापासुन तो निधीसाठी पाठपुरावा करीत होता. मात्र, हाती काहीच आले नाही. त्यामुळे त्याने न्यायासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. मात्र, या प्रकारामुळे मुंडेताई पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.


मावशीच्या विकासाठी ताईंकडून टक्केवारी!
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाथर्डी तालुक्याला मावशी मानले होते. वंचित घटकांसह पाथर्डीच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र, आज ताईंच्या कार्यालयातून पाथर्डीतील गावांच्या विकासासाठी निधीतून 20 टक्क्यांची मागणी होत आहे. एवढेच काय तर लाखो रुपये स्विकारल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे चिक्कीनंतर आता या टक्केवारीची सखोल चौकशी होणे महत्वाचे आहे.