Breaking News

हिवरवाडीच्या विकासासाठी तरुणांनी सक्रिय व्हावे : सुरेंद्र गुदगे


मायणी (प्रतिनिधी) : आत्तापर्यंत हिवरवाडीतील अनेक जाणत्या लोकांनी राजकारण करून गावाच्या हितासाठी काम केले आहे. तिच परंपरा पुढे चालवित आज गावाचा विकास करण्याची खरी जबाबदारी तरुणांची असल्याने हिवरवाडीच्या विकासकामाबरोबरच राजकारणात तरुणांनी सक्रिय होणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले. हिवरवाडी (ता. खटाव) येथे कूपनलिकेचा प्रारंभ नुकताच गुदगे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी शरद कांबळे, अरुण लोहार, रामचंद्र घाडगे, अविनाश जाधव, नाना जाधव, ब्रह्मदेव माने, गुलाब जगदाळे, श्रीरंग जाधव, गणेश देशमुख, बाळासो सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सुरेंद्र गुदगे पुढे म्हणाले, निवडणुका आल्या की अनेक राजकीय नेते आश्‍वासनांची खैरात करतात, मात्र निवडणुका संपल्या की सारे काही विसरतात. मात्र माझ्यासारखा कार्यकर्ता आज कोणतीही निवडणूक नसतानाही दिलेले आश्‍वासन पूर्ण करत आहे. 


विकास कामाबाबत दिलेला एखादा शब्द म्हणजे माझ्यासाठी काळ्या दगडावरील पांढरी रेघ असते. जी कामे होणार आहेत व मंजूर आहेत अशा कामांचाच मी शुभारंभ करत असतो. म्हणुनच आज सर्वसामान्य मतदार माझ्या पाठीशी ठाम उभा आहे असेही त्यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दादासाहेब कचरे यांनी प्रस्ताविक केले. यावेळी मायणी ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव, रामभाऊ सोमदे, प्रसाद कुंभार, अन्सार इनामदार, शंकर कांबळे, श्रीरंग जाधव, राजेंद्र जाधव, गोविंद जाधव यासह हिवरवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.