Breaking News

शीख विरोधी दंगल: सज्जनकुमारांची शरणागती


नवीदिल्लीः 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दोषी आढळलेले काँग्रेस नेते सज्जनकुमार यांनी उच्च न्यायालयासमोर शरणागती पत्करली. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात येणार आहे. सज्जन कुमार यांच्याआधी महेंद्र यादव आणि किशन खोखर या दोषींनीदेखील शरणागती पत्करली आहे. सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
1984 मध्ये दिल्लीतील कँट परिसरात 5 शिखांच्या हत्येप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जनकुमार यांना दोषी ठरवले असून 31 डिसेंबरपर्यंत शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. तिहार तुरुंगात सज्जनकुमार यांना जेल क्रमांक-2 मध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या दोषींपासून सज्जनकुमार यांना दूर ठेवण्यात येणार आहे. शीख कैद्यांपासूनदेखील लांब ठेवण्यात येणार आहे. तुरुंगात प्रत्येक कैद्यांकडून काम करवून घेतले जाते; मात्र सज्जनकुमार यांना तुरुंगात कोणतेही काम करू दिले जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे वय आणि कैद्यांमध्ये राजकारणाचा शिरकाव होऊ नये, या दोन कारणांसाठी त्यांना कामापासून दूर ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.