Breaking News

सातारा-हरपळवाडी लाल परीचे ग्रामस्थांकडून उत्साहात स्वागत


शेंद्रे (प्रतिनीधी) : गेल्या अनेक वर्षांपासून एसटीच्या प्रतीक्षेत असणार्‍या कराड तालुक्यातील हरपळवाडी येथील ग्रामस्थांची प्रतीक्षा अखेर संपली. नुकतीच सातारा-हरपळवाडी लाल परी’चे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. हरपळवाडी गावाला सुरू झालेल्या या बससेवेमुळे येथील विद्यार्थी व जनतेची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

पुणे-बेंगलोर महामार्गावर अतीत गावच्या पश्‍चिमेला सुमारे 10 किलोमीटरवर कराड तालुक्यातील हरपळवाडी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव वसले आहे.येथून 5 किलोमीटरवर पश्‍चिम महाराष्ट्रातील काशीळ-तारळे रस्त्यावर असणारे पाल देवस्थान आहे. हे गाव कराड तालुक्यात असले तरी शिक्षण व कामानिमित्त या गावचा संपर्क साताराशी असतो. मात्र, येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना सातारा जाण्यासाठी सुमारे 10 किलोमीटरची पायपीट करत अतीत येथे यावे लागत होते. ही पायपीट बंद व्हावी व हरपळवाडी गावाला एसटीची बससेवा सुरू व्हावी यासाठी येथील आकाश तळेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सातारा आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधून प्रयत्न करत होते. त्यांच्या या चिकाटीला वर्णे जि. प गटाचे सदस्य व कराड उत्तरचे युवा नेते मनोज घोरपडे यांच्यासह पं. स सदस्य संजय घोरपडे व सरचिटणीस, भाजपा कराड उत्तर यांची मोलाची साथ मिळाली. आणि अखेर नुकतीच सातारा आगाराने सातारा-हरपळवाडी ही बससेवा सुरू केली. रात्री 8.30 वाजता सातारा येथून सुटणारी ही बस मुक्कामी असून दुसर्‍या दिवशी सकाळी सातरकडे रवाना होते. या बससेवेमुळे येथील ग्रामस्थांची विशेषतः विद्यार्थ्याची होणारी पायपीट थांबली आहे. नुकतीच येथील ग्रामस्थांनी गावात आलेल्या या ’लाल परी’चे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी आकाश तळेकर, प्रदीप संकपाळ, अमोल पवार, सागर काळभोर, विशाल काळभोर, सचिन तळेकर, दीपक पवार, सोमनाथ काळभोर, प्रशांत चव्हाण विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.