कोयना प्रकल्पग्रस्त करणार बेमुदत आंदोलन


पाटण (प्रतिनिधी) : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांबाबत जिल्हा प्रशासनाकडून मुंगीच्या पावलाने आणि कासवाच्या गतीने काम चालविले जात आहे, ही खेदाची आणि संतापजनक बाब आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांचे आत्ता होणारे आंदोलन हे जमीनवाटप प्रक्रिया आणि शंभर टक्के विकसनशील पुनर्वसन पूर्ण होत नाही तोपर्यंत उठणार नाही. चार फेब्रुवारीपासून पाटण तालुक्यातील कोयनानगर आणि जावळी तालुक्यातील बामणोलीत पुन्हा बेमुदत आंदोलनास बसणार आहेत, असे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी म्हटले आहे.

कोयनानगर येथे आयोजित कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात डॉ. पाटणकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यानी दिलेल्या आश्‍वासनानुसार व मंत्रालयात कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्‍न तीन महिन्यात मार्गी लावावे असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र तीन महिन्यातील प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राथमिक छाननी आणि इतर कामाला निव्वळ नऊ महिन्याचा कालावधी होवून गेला तरी कसलीही हालचाल केली नाही. कोयना प्रकल्पग्रस्तानी आणखी किती दिवस आश्‍वासनाच्या गाजरावर दिवस काढायचे, असा संतप्त सवाल त्यांनी याप्रसंगी बोलताना केला.
चार फेब्रुवारीपासूनच्या आंदोलनात कोयना प्रकल्पग्रस्त घरातील मुले, महिला व जनावरांसमवेत सहभागी होणार आहेत. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमीन मागणी अर्ज आणि त्यानुसार झालेले संकलन वाचनात पात्र खातेदार किती आहेत? त्याचबरोबर अंशतः जमिनी दिलेले खातेदार किती? नापीक जामिनी दिलेले खातेदार किती? आणि अजिबात जमिन दिलेली नाही असे खातेदार किती? हेसुद्धा निश्‍चित झाले नाही, ते कधी होणार? अजिबात जमीन न दिलेल्या खातेदारांना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीच्या तारखेपासून जमीन मिळेपर्यंत निर्वाह भत्ता कधी देणार व त्याचा प्रस्ताव कधी केला जाणार, मोफत वीज देण्यासाठी कार्यवाही काय केली याची उत्तरे आजही मिळाली नाहीत. कोयना धरणालगत पाणलोट क्षेत्राबाहेर असणार्‍या जावळी, महाबळेश्‍वर व पाटण तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांना शेतीला पाणी देण्यासाठी सिंचन विभागाने काय कार्यवाही केली या सगळ्यांची उत्तरे आंदोलनस्थळी पूर्ण झाल्याची पत्रेच घेऊन आल्याशिवाय आंदोलक उठणार नाहीत. पात्र प्रकल्पग्रस्ताना जामिनी आणि जमिनीला पाणी देऊन कोयना प्रकल्पग्रस्तांची होलपट थांबली पाहिजे होती. मात्र शासनाच्या वेळकाढूपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे कोयना प्रकल्पग्रस्ताना आपल्या त्यागाची खूप मोठी किंमत मोजावी लागली. त्या किमतीचा मोबदला आत्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलनास बसलेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी एकही प्रकल्पग्रस्त आंदोलन स्थळावरून उठणार नाही ही कोयना प्रकल्पग्रस्तांची आजही जिद्द आहे. याचवेळी श्रमिक मुक्त दलाशी संबंधित सगळ्या संघटना महाराष्ट्रभर आंदोलनास बसणार आहेत.
मेळाव्यास श्रमिक मुक्ती दल पाटण तालुका अध्यक्ष संजय लाड, सचिव महेश शेलार, संघटक सचिन कदम यांच्यासह हजारो प्रकल्पग्रस्त पुरुष, महिला खातेदार उपस्थित होत्या.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget