Breaking News

शहर समृध्दी उत्सवात महिलांना मिळाले आर्थिक साक्षरतेचे धडे


अंबाजोगाई (प्रतिनिधी) बचतगटाच्या माध्यमातून यापुर्वीही नगरपालिकेने वेळोवेळी महिला सबलीकरणासाठी पुढाकार घेवून महिलांना सहकार्य केलेले आहे. त्यामुळे महिलांनी उद्योगवृध्दीसाठी प्रयत्न करावेत. बचतगटांद्वारे सुरू केलेला व्यवसाय मोठा करावा. स्वावलंबी व्हावे, नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध लोकहिताच्या योजनांचा लाभ घ्यावा व आपला आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचवावा, कौशल्यपुर्ण प्रशिक्षण घेवून उद्योजक व्हावे नगरपरिषद आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ. रचना सुरेश मोदी यांनी केले. तसेच यावेळी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांनी आवाहन केले. तरजिल्हा आग्रणी बँकेचे अधिकारी विजय चव्हाण यांनी बँकांच्या वतीने राबविण्यात येणार्या योजना तसेच विविध महा मंडळांतर्गतच्या कर्ज विषयक योजनांची सखोल माहिती देवून वेळेत परतफेड केल्यास अनुदानाचे मिळणारे लाभ याबाबत मार्गदर्शन केले.नगरपरिषदेच्या वतीने आयोजित शहर समृध्दी उत्सवातून महिलांना आर्थिक साक्षरतेचे धडे मिळाले. अंबाजोगाई नगरपरीषदेच्या वतीने दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना व राष्ट्रिय नागरी उपजिविका अभियान नगरपरिषद, अंबाजोगाई व महिला आर्थिक विकास महामंडळ लोकसंचलीत साधन केंद्र, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार,दि. ७ जानेवारी रोजी लोकनेते विलासरावजी देशमुख सभागृहात शहर समृद्धी उत्सव व आर्थिक साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.