Breaking News

भाजप कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत गटबाजी आ.राजळे व गांधी समर्थकांमध्ये खडाजंगी

BJP साठी इमेज परिणाम


शेवगाव/प्रतिनिधी
लोकसभा व विधानसभा निवडणुक जवळ येत असतांनाच सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील खासदार दिलीप गांधी व आ. मोनिका राजळे यांच्यातील अंतर्गत गटबाजीने जोर खाल्ला असून ढोरसडे येथे सभामंडपाच्या उद्घाटनाच्या कोनशीलेवर आ. मोनिका राजळे यांचे नाव नसल्याने राजळे यांच्या समर्थकांनी या सभामंडपाच्या उद्घाटनासाठी येणारे खा. दिलीप गांधी यांना गावात येवू न देता बाहेरच रोखले. तर शहरटाकळी येथे उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना करण्यात येणारे गॅस वाटप खासदारांऐवजी स्थानिक कार्यकर्त्यांनीच केले.

तालुक्यातील ढोरसडे येथे खा. गांधी यांच्या निधीतून सभामंडप बांधण्यात आलेला आहे. खा. गांधी हे बुधवार व गुरुवार असे दोन दिवस शेवगाव तालुक्याच्या दौ-यावर असून बुधवारी सायंकाळी ढोरसडे येथील सभामंडपाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र या सभामंडपाच्या ठिकाणी बसवण्यात येणार्‍या कोनशीलेत स्थानिक आ. मोनिका राजळे यांचे नाव नसल्यामुळे राजळे यांचे समर्थक व ढोरसडे-अंत्रेचे माजी सरपंच गुरुनाथ माळवदे व त्यांच्या सहकार्‍यांनी आक्रमक भुमिका घेतली. स्थानिक व पक्षाच्या आमदार असतांनाही त्यांचे नाव कोनशीलेत का टाकले नाही ? असा त्यांचा आक्षेप होता. आम्ही तुम्हाला मंडपाचे उद्घाटन करु देणार नाही. अशी आक्रमक भुमिका घेतली. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना समजाविण्याचा भरपुर प्रयत्न केला. मात्र राजळे समर्थक आपल्या भुमिकेवर ठाम राहिल्याने खासदार गांधी यांनी ढोरसडे येथे जाण्याचे टाळले. 

गेल्या काही दिवसांपासुन भारतीय जनता पक्षात दिलीप गांधी व मोनिका राजळे समर्थकात अंतर्गत शीतयुध्द सुरु आहे. या दोन्हीही गटांनी कायम परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम खा.गांधी गटाकडून नेहमी केले जाते. असा आ.राजळे समर्थकांचा आक्षेप आहे. गांधी यांच्या तालुक्यात होणार्‍या दोन दिवसीय दौर्‍याच्या नियोजनासाठी सोमवारी शहरातील एका हाँटेलवर आयोजित बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. केवळ विकास कामांच्या घोषणा केल्या जातात. अंमलबजावणी मात्र होत नाही असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे बुधवारी शहरातील दुसर्‍या एका कार्यकर्त्यांची बैठक खासदार गांधी यांनी घेतली. मात्र कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने खुर्च्या गोल आकारात ठेवून चर्चा करण्यात आली. या चर्चेचे गुपीत बाहेर जाऊ नये म्हणून बैठकी अगोदरच पत्रकरांना माहिती देवून बाहेर जाण्यास सांगितले. या बैठकीस मोनिका राजळे यांचे बहुसंख्य समर्थक गैरहजर होते. एवढेच नव्हे तर राजळे ही बैठक सुरु असतांना त्या लाँनसमोरुन गेल्या मात्र त्याही त्या ठिकाणी फिरकल्या नाहीत. गुरुवारीही घोटण येथे गांधी यांचा कार्यक्रम सुरु असतांना खानापूर येथील एका राजळे समर्थकाची गांधी यांच्या समर्थकाबरोबर किरकोळ बाचाबाची झाल्याचे समजते. एकंदरीतच जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तस-तशी भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून येत असल्याचे जाणवत आहे.