Breaking News

मुसांडवाडीमध्येे गणीभाई चौक नामकरण कार्यक्रम


पुसेसावळी (प्रतिनिधी) : कराड उत्तर मतदारसंघातील मुसांडवाडी गावातील प्रलंबित विविध विकासकामे प्राधान्याने मार्गी लावली जातील. या भागातून जात असलेल्या उरमोडीच्या पोटपाटाचे कामही लवकरच मार्गी लागेल तसेच आज गावामध्ये मुख्य चौकास गणीभाईंचे नाव दिल्याने त्यांच्या स्मृती सदैव जागृत राहतील, असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केेले. 

मुसांडवाडी (ता. खटाव) येथे गणीभाई चौकाचा नामकरण सोहळा व विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, पंचायत समितीचे माजी सभापती संदिप मांडवे, मार्केट कमिटीचे माजी सभापती सी. एम. पाटील, वडगावचे सरपंच संतोष घार्गे, व्हा. चेअरमन विलास शिंदे, महादेव माने, चेअरमन राजेंद्र माने, भिकाजी कटे, सुरेश घाडगे, अधिकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती, 

या कार्यक्रमात आमदार पाटील पुढे म्हणाले की, या परिसरातील वाडीवस्तींना लागणार्‍या कामांसाठी आजवर लाखो रूपयांचा निधी उपलब्ध केला असून आगामी काळामध्येही येथे भरिव निधीची तरतुद केली जाईल. आता काही दिवसात निवडणुकीचे वारे वाहिल आणि काहीजण भुलथापा मारतील, मात्र जनतेने त्यास बळी पडू नये. मागील निवडणुकीत दिडशे कोटीचा डंका वाजविणार्‍यांनी विकासकामांचे केवळ नारळच फोडले, पण विकास कुठेही दिसला नाही. त्यामुळे जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. 

या वेळी शिवाजीराव सर्वगोड म्हणाले की, या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आमदारसाहेबांच्या माध्यमातून मोठी विकासकामे झालेली आहेत. त्यामुळे आपणही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. याशिवाय या विभागातुन गरजूंना घरकुल, घरगंटी, पिठाची चक्की यासारखे वैयक्तिक लाभही मिळवून दिले आहेत. नक्कीच त्याची जाणीव येथील जनता ठेवेल, अशी आम्हास खात्री आहे.
कार्यक्रमास सूरज शेख, जैनुद्दीन पटेल, जलालुद्दिन पटेल, सलमान पटेल, उस्मान शेख, रामहरी मोरे, किसन इंगळे, राजेंद्र इंगळे, चाँद पटेल, तुषार मोरे, शहाआलम पटेल, अरमान पटेल, रियाज पटेल, संजय मोरे, अक्षय घाडगे, हणमंत मोरे, सुनिल इंगळे, संतोष मोरे, संकेत मोरे आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक खुदबुद्दीन पटेल यांनी, तर आभार उपसरपंच आसिफ मुलाणी यांनी मानले.