Breaking News

टंचाई निवारणासाठी सर्वांचे सहकार्य हवे : प्रांताधिकारी


वडूज (प्रतिनिधी) : गावागावांत निर्माण झालेली पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाबरोबर सहकार्याची भूमिका दाखविणे गरजेचे असल्याचे मत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले.
खातवळ (ता. खटाव) येथे निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी गलाई व्यवसायिक प्रभाकरशेठ फडतरे यांनी वडील (कै.) शिवाजीराव फडतरे यांच्या स्मरणार्थ स्वत:च्या खासगी विहीरीतून गावाला विनामोबदला स्वखर्चाने पाणी पुरवठा सुरू केला. त्याचा शुभारंभ प्रांताधिकारी श्री. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी नरेंद्र मेंढेवार, मायणी अर्बनचे माजी संचालक शंकरराव फडतरे, सुनील फडतरे, दत्ताशेठ बागल, डॉ. गजानन फडतरे, चेअरमन नवनाथ फडतरे, प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खटाव माण तालुक्यांत निर्माण झालेली पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न केले जात असल्याचे सांगून प्रांताधिकारी कांबळे म्हणाले, टंचाईकाळात अनेक गावांचे शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याचे प्रस्ताव येत आहेत. त्या प्रस्तावानंतर त्या गावांची पाहणी, पर्यायी स्थानिक उपाय योजना आदी बाबी प्रशासनामार्फत राबविल्या जातात. खातवळ येथील प्रभाकर फडतरे यांनी दिवंगत वडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ गावाला तहहयात विना मोबदला स्वखर्चाने पाणी पुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. नोकरी, व्यवसाय, उद्योगानिमित्त आपण परगावी असलो तरी आपल्या गावाशी असणारी आपली नाळ व सामाजिक बांधिलकी यानिमित्ताने अधिक दृढ झाली आहे. येथील टंचाई निवारण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

ज्येष्ठ नेते देवानंद फडतरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डी. आर. महामुनी यांनी आभार मानले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य महादेव अहीवळे, सुभद्रा फडतरे, माजी सरपंच अशोक फडतरे, सत्यवान फडतरे, आनंदराव फडतरे, पोपट फडतरे, राहूल शिंदे, प्रमोद फडतरे, तानाजी बागल, लालासाहेब पाटील, नेताजी मोहिते, बाबुराव फडतरे, संभाजी फडतरे, गोपाळ फडतरे, धनाजी फडतरे, नामदेव फडतरे, विजय फडतरे, आबासाहेब तोरणे, आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.