अमृतवाहिनीचा मेधा महोत्सव हा युवकांसाठी मोठे व्यासपीठ - माने


संगमनेर/प्रतिनिधी
प्रत्येकाने अपयशातून उर्जा घेतली पाहिजे. युवकांनी यश, अपयशाचे अवलोकन करुन आपले ध्येय ठरवून परिश्रम केल्यास नक्कीच यश मिळेल. विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जिद्द आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आत्मविश्‍वास देणारा अमृतवाहिनीतील मेधा महोत्सव हा युवकांसाठी मोठे व्यासपीठ ठरणार असल्याचे प्रतिपादन थर्माकॉलचे निर्माते उद्योजक रामदास माने यांनी केले आहे.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा युवा महोत्सव 2019 या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात तर व्यासपीठावर बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनचे संस्थापक अदिक कदम, विश्‍वस्त शरयु देशमुख, लक्ष्मणराव कुटे, माने, अ‍ॅड. आर.बी.सोनवणे, तुळशीनाथ भोर, नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्रा. डॉ.एम.ए.व्यंकटेश, प्रा.व्ही.बी धुमाळ, समन्वयक प्रा.जी.बी काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामदास माने म्हणाले कि, गरिबीचे कारण दाखवून परिस्थिती पासून पळू नका. जिद्द हीच यशाची गमक आहे. आपण जसे विचार करतो, तसेच करीअर घडते. म्हणून प्रत्येकाने मोठी स्वप्ने पहा. रोजगार मागणार्‍यापेक्षा रोजगार देणारे बना. मान तालुक्यातील खेड्यागावातून अत्यंत गरिबीतून सुरु झालेला प्रवास, रोजगार हमीची कामे, आयटीआय शिक्षण घेत असतांना दोन वर्षे केलेले हॉटेलमधील वेटरकाम, नोकरी करतांना एक वर्षे पाण्याच्या टाकीखाली काढलेल्या रात्री, नोकरी करतांना पुर्ण केलेले शिक्षण आणि चांगल्या पगाराची नोकरी असतांनाही उद्योगाकडे वळण्याचा निर्धार यातील अनेक गोड कटु अनुभव सांगितले. आज माने गु्रप कंपनीच्या 20 शाखा असून त्यातून देशातील 80 टक्के थर्माकॉलची निर्मीती होत आहे. ग्रामीण व शेतकरी पार्श्‍वभूमी असतंनाही यशस्वी उद्योजक हा प्रवास जिद्दीमुळे झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची जिवनव्यथा ऐकतांना उपस्थितांच्या डोळ्याात पाणी आले.
आ.थोरात म्हणाले कि, मेधा महोत्सवामुळे युवकांना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. अमृतवाहिनी संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. मेधा महोत्सव हा जिल्ह्याचा मानबिंदू ठरला आहे. शालेय जिवनात काही व्यक्तीमत्वांचा आदर्श घेवून वाटचाल होणे गरजेचे आहे. यासाठी या महोत्सवात विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे. प्रबोधन, मनोरंजन, मार्गदर्शन असा हा महोत्सव होत आहे. हा महोत्सव प्रत्येकासाठी अनमोल ठेवा ठरावा असाच आहे. जिवनात गुणवत्तेने प्रत्येकाने पुढे जावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कदम म्हणाले कि, बॉर्डरलेस फाऊंडेशन ही संस्था काश्मिरमध्ये अनाथ मुलांच्या शिक्षणाचे व संगोपणाचे काम करत आहे. काश्मिरात आतंकवादी व भारतीय सैनिक यातील चकमकींमध्ये कुपवाडा जिल्हातील नारिकांचे जिवनमान हरवले आहे. तेथील लोकांना शांतता हवी आहे. अतिरेकी बंदूकीच्या धाकावर स्त्री स्वातंत्र्यावर गदा आणत असून सर्वांनी तेथील आई उभी करण्यासाठी काम करावे. सीमेच्या पलिकडे मानवता असून ती आपण वाढविली पाहिजे. मेधा महोत्सव हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. सर्वांनी देशाच्या एकात्मतेसाठी काम केले पाहिजे. या कार्यक्रमासाठी डॉ.मच्छिंद्र चव्हाण, प्रा.अशोक मिश्रा, प्रा.मनोज शिरभाते, एस.टी.देशमुख, जे.बी.सेट्टी, शितल गायकवाड, विलास शिंदे, अशोक वाळे, नामदेव गायकवाड, केशवराव जाधव, डॉ.एम.आर.वाकचौरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
चौकट
बॉर्डरलेस फाऊंडेशनला अमृतवाहिनीची एक लाख रुपयाची मदत
काश्मिर व सीमालगतच्या भागात निराधार मुला मुलींच्या संगोपण व शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या बॉर्डरलेस फाऊंडेशनला सामाजिक बांधिलकीतून आ.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेने 1 लाख रुपयांचा मदतीचा धनादेश संस्थापक अदिक कदम यांचेकडे दिला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget