Breaking News

विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता विकसित कराव्यात : साळी


रहिमतपूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे अफाट अंगभूत क्षमता आहेत. त्यांनी आपल्या क्षमता वेळीच ओळखून त्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विकसित करायला हव्यात असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे (उच्च शिक्षण विभाग) विभागीय सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी केले.

रहिमतपूर येथील सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखा माने - कदम या होत्या. यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री किरण ढाणे, राहुल मगदुम, धोंडिबा कारंडे, प्राचार्या डॉ. सौ. भाग्यश्री जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. शरयू भोसले, प्रा. डॉ. शिवराज गायकवाड, माजी विद्यार्थी प्रा. प्रकाश टोणे, विक्रीकर सहाय्यक जयश्री मोरे यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, माणसं अपार कष्टातून मोठी होतात. त्यासाठी आंतरिक प्रेरणा महत्वाची ठरते. प्रसिद्धीचे वलय मेहनतीशिवाय निर्माण होत नाही. निश्‍चित ध्येय, परिश्रम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न, सकारात्मक विचार हे माणसाला यशाच्या बिंदूपर्यंत पोहचवितात. या महाविद्यालयाने विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या दैदिप्यमान यशाचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.

अध्यक्षस्थानावरून सौ. चित्रलेखा माने-कदम म्हणाल्या की, महाविद्यालयीन उपक्रम आपले व्यक्तिमत्व फुलवतात. कला कौशल्ये विकसित करतात. अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या जीवनाला निश्‍चित अशी दिशा मिळत असते. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी महत्वाचे ठरतात.
अभिनेत्री किरण ढाणे म्हणाली, माझा अभिनयाचा प्रवास या कॉलेजच्या स्टेजपासूनच सुरु झाला. याच स्टेजवर मध्यवर्ती युवा महोत्सवात आमच्या टीमने प्रथमच ’कोयता’ नावाची एकांकिका सादर केली होती. यानिमित्ताने मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पहिला पुरस्कार रहिमतपुरमध्येच मिळाला होता. आजही आमचा, महाविद्यालयाने आपुलकीने केलेला हा सत्कार मला माझ्या घरातील सत्कार वाटतो आहे. युवकांनी स्वप्न पाहिली पाहिजेत, स्वप्नांचा पाठलाग केलात तर ती पूर्ण होतात. असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. 
यावेळी ’पळशीची पीटी’चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे, राहुल मगदुम, प्रा. प्रकाश टोणे, जयश्री मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सांस्कृतिक विभागाच्या व जिमखाना विभागाच्या अहवालाचे वाचन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी - विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सरदार बाबासाहेब माने यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्या डॉ. सौ. भाग्यश्री जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. नलिनी ओवाळ यांनी करुन दिला. प्रा. सुनंदा मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रदीप दीक्षित यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्व शाखाप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.