Breaking News

राठोडांना संग्राम सोडून काहीच दिसेना महापौरपद गेल्याने झाले बेचेन

अहमदनगर/प्रतिनिधी :- शिवसेनेचा महापौर होण्यासाठी शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी आमच्याशी संपर्क केला होता. मात्र, आम्ही त्यांना मदत केली नाही. ऐन मोक्यावर महापौरपद गेल्यामुळे उपनेते अनिल राठोड हे बेचेन झाले आहेत. त्यामुळे रात्र आणि दिवस त्यांना केवळ संग्रामच आठवतो आहे. त्या भरात ते काहीही आरोप करीत आहेत. अशी टिका राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

मनपात आम्ही भाजपला पाठिंबा का दिला किंवा मी आमदारकीचा राजिनामा द्यायचा की नाही. यासाठी आम्हाला शिवसेनेने सांगण्याची गरज नाही. आम्ही त्यांचा दाखला किंवा आयएसओ प्रमाणपत्र मागितले नाही. त्यामुळे त्यांनी जो आरोपांचा खेळ चालविला आहे. तो बंद करावा. मनपा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देताना ज्यांना सांगायचे होते. त्यांना आम्ही सांगितले आहे. 

पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतली तो आम्हाला मान्य आहे. पक्षनिष्ठा म्हणून आम्ही राष्ट्रवादीचे चांगले संघटन शहरात बांधले आहे. शिवसेनेची पिछेहाट झाल्याने त्यांनी फक्त आम्हाला टारगेट करुन आमच्यात डोकं खुपसणे सुरू केले आहे. एवढेच काय, तर केडगावसारख्या हत्याकांडात बळजबरीने आमचे नाव कोणी गोवले हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे आता आमच्या राजकाराणात कोणी लक्ष घालु नये. असे खडेबोल जगताप यांनी शिवसेनेला सुनावले.


खरे पाहता केडगाव हत्याकांडात शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आदेशानेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. तपास पारदर्शी व्हावा यासाठी नव्हे तर, राजकीय सुडबुद्धीने आम्हाला टारगेट करण्यात आले. पोलिसांना मंत्र्यांचे फोन येत होते. त्यामुळे हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा. असा अहवाल देखील पोलिसांनीच पाठविला होता. तो गोपनिय असला तरी जगजाहीर झाला आहे. त्यामुळे खरे आरोपी कोण हे नव्याने सांगायला नको. शिवसेना आज सत्तेत आहे. त्यांच्याकडे उद्योग व परिवहन खाते आहे. मात्र, राठोड हे नगरच्या तरुणांना उद्योगधंदा मिळावा यासाठी मंत्र्यांना निमंत्रीत करणार नाही, किंवा शहराची बस व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार नाही. पण एखाद्या गुन्ह्याला राजकीय वळण देण्यासाठी सगळ्यांची मदत घेतली असा आरोप देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केला.


त्या दोघांच्या मृत्युला शिवसेना जबाबदार..!
दोघांची हत्या झाल्यानंतर त्यांना योग्यवेळी उपचार मिळाले असते तर कदाचित कोणीचातरी जीव वाचला असता. मात्र, जाणीवपुर्वक त्यांच्यापर्यंत अ‍ॅम्ब्युलन्स पोहचु दिली नाही. केवळ या प्रकरणाचे राजकारण करण्यासाठी दोन जीव घेतले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात कोण दोषी आहे. हे स्पष्ट होईल. असा आरोप जगताप यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला आहे.
आम्ही पौशासाठी पाठिंबा दिला अशी नवी अफवा सुरू केली आहे. पुर्वी म्हणे केडगाव हत्याकांडातून बाहेर पडण्यासाठी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राठोड यांनी पहिल्यांदा नेमकी कोणता आरोप करायचा हे ठरवून घ्यावे. वास्तव पाहता, त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. मात्र, तो प्रस्ताव आम्ही नाकारला. त्यामुळे सत्ता गेली. म्हणून त्यांना झोपेत, उठता-बसता, रात्रंदिवस राष्ट्रवादीच दिसत आहे. त्यातून त्यांची बेचेनी सुरू झाली आहे.

राठोडांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये...
शिवसेनेचे सरकार होते तेव्हा, राठोडांना मंत्रीपद दिले होते. मात्र, अवघ्या 11 महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पायउतार केले होते. त्यामुळे त्यांनी स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. मागील निवडणुकीत त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आहे. तसेच वाहनचालक व पानटपरी याव्यतीरीक्त त्यांनी कार्यकर्त्यांना मोठे केले नाही. तसेच उपनेते असून देखील जिल्ह्यात व शहरात शिवसेना वाढविण्यासाठी त्यांनी काय योगदान दिले. हे सांगावे. त्यामुळे त्यांना मला तरी पक्षनिष्ठा शिकवू नये. असे संग्राम जगताप म्हणाले.

...तर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ
विकासाच्या मुद्द्यावर भाजपला मी व नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. माझ्या आमदारी व नगरसेवकांचा मोठेपणा यापेक्षा शहराचा विकास मला योग्य वाढला. शिवसेनेने आमदारकी भोगली, महापौरपद भोगले मात्र, शहराचा विकास करता आला नाही. त्यामुळे सगळ्यांच्या विरोधाला झिडकारून केवळ विकासाच्या मुद्द्यावर भाजपला एकहाती सत्ता दिली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात त्यांनी शिवसेनेच्या पावलांवर पाऊल ठेवले तर, त्यांचा देखील पाठिंबा काढून घेऊ. असे जगताप म्हणाले.