Breaking News

दखल- गुणवत्ता महत्त्वाची, की प्रतीकं?


पुणेरी पगडी ही एका विशिष्ठ धर्माची मक्तेदारी नाही; परंतु पूर्वी गुणवत्तेची मक्तेदारी एका विशिष्ठ जातीकडं होती. अन्य जाती, धर्माच्या लोकांनी विद्वतेच्या वाट्याला जाऊ नये, असं मुद्दामहून केलं जातं होतं. पुणेरी पगडी हे पेशव्यांचं वैशिष्टय होतं; परंतु पेशव्यांच्या पराक्रमाचे जसे गोडवे गायिले जातात, तशा या पगडीखालील डोक्याचा वापर संभाजी महाराजांपासून अनेकांच्या बाबतीत कट, कारस्थानं करण्यात झाला. बहुजनांना ज्ञानाची दारं खुली करणा-या महात्मा फुले आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या सावित्रीबाईचं कार्य ही पुण्यातलंच आहे. विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव असताना विद्यार्थ्यांना पुणेरी पगडी घालण्याचा आग्रह धरणं कालबाह्य मानसिकतेचं लक्षण आहे.

पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाची ओळख ॠऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी आहे. असं असलं, तरी जगाच्या तुलनेत या विद्यापीठाचं स्थान काय, त्याची गुणवत्ता किती आणि त्यातून काय दर्जाचं संशोधन होतं, हे पाहणं विद्यापीठाच्या प्रशासनाचं आणि कुलगुरूचं काम आहे. काळाच्या ओघात जुने जाऊ द्या मरणालागूनी अशी भूमिका घ्यायला हवी. विद्यापीठाचा दर्जा सुधारणं तर जमत नाही, मग, पारंपरिक मुद्यांना महत्त्व देऊन चर्चा घडवून आणायची, असा तर विद्यापीठ प्रशासनाचा हेतू नाही ना, असा संशय निर्माण होतो. शिक्षणात दररोज विनोद करणा-या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कधी नव्हे, ती समंजस भूमिका घेऊन पगडीपेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्या, असा आदेश देऊनही पुणे विद्यापीठानं पदवीदान समारंभात पगडी घालण्याला महत्त्व द्यावं, यावरून सावित्रीबाईंच्या विचारापासून हे विद्यापीठ किती दूर गेलं आहे, हे समजतं. आता बहुतांश जुन्या परंपरा, रुढी काळाच्या ओघात मागं टाकाव्या लागत असताना या विद्यापीठानं मात्र परंपरांना कवटाळून बसण्यात धन्यता मानावी, याला काय म्हणावं? पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षणाच्या दर्जाची आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची चर्चा होणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात वेशभूषेवर आणि पाहुण्यांना पगडी द्यावी की नको, या विषयावर वाद रंगतो आहे. पदवीप्रदान समारंभात विद्यार्थ्यांनी गाउनऐवजी झब्बा-कुर्ता परिधान करावा इथपासून ते पाहुण्यांचं स्वागत करताना पगडी द्यावी की नको, इथपर्यंतच्या अशैक्षणिक गोष्टींवर चर्चा होते आहे. फुले पगडी, की पुणेरी पगडी या प्रतीकांच्या चर्चेत विद्यापीठातील शिक्षणाचा आणि तिथं शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा मुद्दा कुठंही चर्चेत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. सावित्रीबाई फुले यांचं नाव विद्यापीठाला दिलं; पण महात्मा फुले यांचं प्रार्थनागीत विद्यापीठात म्हटलं जात नाही. माणसाचा पुतळा उभा करायचा, नाव द्यायचं; पण विचारांना महत्त्व द्यायचं नाही, असं चाललं आहे. 

खरं तर विद्यापीठानं कोणतीच पगडी देऊ नये. ब्राह्मणेतर म्हणतील महात्मा फुले यांची पगडी द्या, ब्राह्मण म्हणतील त्यांची पगडी द्या, गांधीवादी म्हणतील गांधी टोपी द्या. हा वाद वाढविण्यापेक्षा काहीच देऊ नये. विद्यापीठ हे शिक्षणासाठी आहे, तिथं शिक्षणाचाच विचार झाला पाहिजे; परंतु विद्यापीठ प्रशासनाला वाद ओढवून घ्यायची तीव्र इच्छा झालेली दिसते. पदवीप्रदान हा विद्यार्थ्यांचा सन्मान असतो. त्यांना वेश परिधान करताना अभिमान वाटला पाहिजे, असे निर्णय घेतले पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थी, माजी विद्यार्थी, तज्ज्ञ यांना एकत्र आणून सर्वसहमतीनं विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. पाहुण्यांना पुणेरी पगडी देऊन गौरव करताना आपण मध्ययुगीन मानसिकतेत आहोत, हेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दाखवून दिलं आहे. पदवीदान समारंभात पुणेरी पगडी घालण्यास विरोध करणार्‍या विद्यार्थी संघटनांच्या काही प्रतिनिधींनी सोहळा सुरू असताना निदर्शनं सुरू केली. पुणेरी पगडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुरक्षारक्षकांनी निदर्शकांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील कार्यक्रम पार पडला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पदवीदान समारंभासाठीचा ब्रिटीशकालीन पोशाख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे; परंतु ठराविक पोशाखात येऊनच पदवी स्वीकारली पाहिजे, हा हट्ट कशासाठी? विद्यापीठात पदवी घेतानाही अनेक विद्यार्थ्यांची हाताची व पोटाची गाठ पडण्यात मारामार होत असते. त्यात पुन्हा पदवीसाठी ठराविक वेश धारण करण्याचा नियम कशासाठी, असा प्रश्‍न पडतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी अशी विद्यापीठस्तरापासून होत असेल, तर ते गैर आहे. काही विद्यार्थी संघटनांनी डोक्यावर पुणेरी पगडी घालण्यास विरोध दर्शवला होता; मात्र हा विरोध डावलून सोहळ्यात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी पुणेरी पगडी घातल्याचं दिसून आलं. त्यामुळं वातावरण तापलं. सोहळा सुरू असतानाच काही प्रतिनिधींनी व्यासपीठाच्या दिशेनं जात पुणेरी पगडीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. काही कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून एका खेचराला पुणेरी पगडी घातली, हा ही आचरटपणा आहे. 

विद्यापीठातला हा वाद होण्याअगोदर गेल्या वर्षीही पुण्यात पगडीवरून वाद झाला होता. छगन भुजबळ तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सत्कार करण्यात आला. तिथं पुणेरी पगडी आणण्यात आली होती. ती द्यायला नकार देऊन शरद पवार यांनी भुजबळ यांना फुले पगडी घातली. तसंच यापुढं राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पुणेरी पगडी घालू नये, असं बजावलं. वास्तविक हा एक क्रांतिकारी निर्णय होता. शिक्षणाची मूठभरांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वसामान्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करणा-या महात्मा फुले यांच्या म्हणजे बहुजनांच्या पगडीचा सन्मान होता; परंतु काहींना त्यात ब्राम्हणद्वेष दिसला. वास्तविक कुणी कुणाची पगडी घालायची, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असताना त्यात पवारांवर टीकेचे आसूड ओढले गेले. फुले यांची पगडी ही तमाम शेतक-यांची पगडी होती. त्याला पागोटे असंही म्हणत. अन्यायाविरोधातलं, शोषणाविरोधातलं प्रतीक म्हणून त्या पगडीचा सन्मान होणार असला आणि त्या माध्यमातून फुले यांच्या विचाराचा प्रसार होणार असला, तर त्यात काहीच वावगं नाही; परंतु बदलाला सहजासहजी तयार न होणारा आणि अजूनही पुणेरी पगडीच्या धाकात असलेल्यांनी टाहो फोडला. राज्यात भाजपचं सरकार आहे, म्हणून मुद्दाम पुणेरी पगडीचा म्हणजे एका ठराविक जातीचा तिरस्कार केला जात आहे, असं चित्र निर्माण करण्यात आलं. ओबीसी नेते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुणेरी पगडी देताना पवार यांच्यासह अन्य कुणी जसा विरोध केला नाही, तसंच भुजबळ यांना पुणेरी पगडी घालताना अन्य कुणाच्या पोटात मळमळ होण्याचं काहीच कारण नव्हतं. महात्मा फुले यांच्या पागोटयाचा वापर म्हणजे समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि परिवर्तनवादी विचारांची कास धरणं असा आहे. मात्र पवार यांच्यावर देशव्यापी टीका झाल्यानं त्यांना खुलासा करावा लागला. ज्यांना आदर्श मानतो, त्या महात्मा फुले यांची पगडी वापरावी, हाच हेतू होता. बरीच मंडळी दुखावली, मात्र माझा यात दुसरा काहीही हेतू नव्हता. पुण्यात वाढलो आणि शिकलोही. त्यामुळे पुण्याविषयी अभिमान आहे असं पवार यांना सांगावं लागलं. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ’हल्लाबोल’ आंदोलनाच्या पुण्यातील सांगता सभेत ’पुणेरी’ऐवजी ’फुले पगडी’चा वापर करण्याची सूचना पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केली होती. समता, परिवर्तन, विज्ञानाचा पुरस्कार करणा-या फुले यांचे विचार पुढं नेणं ही सामाजिक आणि राष्ट्रीय गरज आहे. महाराष्ट्रात पगडीचं राजकारण तेव्हापासून तापलं आहे. त्यामुळं सार्वजनिक कार्यक्रमात सत्काराची पगडी या विषयाचा राजकीय नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील कार्यक्रमात याची प्रचिती आली. राष्ट्रवादीचे माजी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा सत्कार करताना पगडी वयोवृद्ध ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील यांच्या हातात दिली. किमान त्यांनी पगडी घातली, तर कोणी काही बोलणार नाही, असं स्पष्टीकरण गडाख यांनी दिलं होतं. पगडी हे खरंतर प्रतीक. त्याआडून राजकारणातील अनेक बेरीज-वजाबाक्यांचे डावपेच अख्ख्या महाराष्ट्रात लढवले जाऊ लागले. हा वाद पगडीचा आहे की विचारांचा? या वादातून महाराष्ट्राला काय मिळालं? तरुणांनी यातून काय धडा घ्यायचा? डोक्यात काय विचार साठवायचे? सध्याच्या घडीला भुजबळ हे महाराष्ट्रातील एक प्रमुख ओबीसी चेहरा. बहुजन समाजाला एकाच पगडीखाली आणण्यासाठी हे पगडीचं सोशल इंजीनिअरिंग पवारांना साधायचं होत का, या प्रश्‍नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. एकीकडं भाजपनं पुणेरी पगडीवरून पवार यांच्यावर टीका केली आणि त्याच पक्षाचे नेते राहुल जाधव पिंपरी- चिंचवडच्या महापौर निवडणुकीसाठी महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करून, फुले पगडी घालून महासभेत आले, तर त्यांच्या पत्नीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला होता. वेगळा वेश परिधान करून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं खरं; पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढं पुणेरी पगडीऐवजी फुले पगडीचा वापर करा, असं वक्तव्य करणा-या पवार यांच्या विचारांची खुद्द भाजपनं पाठराखण केल्याची चर्चा होती.