Breaking News

कृषीपंपधारकांचा सोमवारी रस्ता रोको, चक्का जाम


कराड (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील कृषी पंपधारकांच्या वीजदरवाढीविरोधात सोमवारी (दि. 21 रोजी) कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको व चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉम्रेड सयाजीराव पाटील, सातारा जिल्हा पाणी पुरवठा संस्था संघाचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील, अ‍ॅड. रवींद्र पवार, युवराज जाधव, दाजी जमाले आदी उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, युती शासनाने कृषी पंप धारकांच्या वीज बिलामध्ये पाच वेळा दरवाढ केली आहे. ती शेतकर्‍यांना परवडणारी नाही. या विषयावर उर्जामंत्र्यांसोबत 8 ते 10 वेळेस बैठक होऊनसुध्दा अद्याप निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शेतकर्‍यांनी 1 रूपया 16 पैसे प्रति युनिट वीज बिल भरावे व राहिलेली रक्कमेस शासनाकडून सबसीडी देण्याचे ठरले. दुसरे वीज बिले चुकिच्या पध्दतीने दिली जात आहेत, ती दुरूस्त करावीत अशी मागणी होती. तेव्हा 15 ऑगस्ट 2018 पर्यंत दुरूस्ती केली जाईल सांगण्यात आले मात्र अद्याप दुरूस्ती झालेली नाही. शासन घोषणा करत आहे, मात्र निर्णय घेत नाही. त्यामुळे कोल्हापूर येथे रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.


पिंपोडेमधून विवाहिता बेपत्ता वाठार स्टेशन, दि. 16 (प्रतिनिधी) : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील कविता प्रमोद घाडगे ही विवाहिता रविवार, दि.13 रोजी राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. प्रमोद घाडगे यांचे पिंपोडे येथे सराफी दुकान आहे, त्यांची पत्नी कविता ही गृहिणी आहे. सौ. घाडगे या रविवारपासून कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. घाडगे कुटूंबियांसह नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र त्या कोठेच आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्या बेपत्ता झाल्याची तक्रार वाठार पोलीस स्टेशनला देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. याबाबत कोणास काही माहिती असल्यास 97660 49853 या मोबाईलवर संपर्क साधावा.