Breaking News

सरकारी विभागांमध्ये भारत-पाकिस्तानसारखे संबंध; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच टीका;भरोसा सेवा केंद्राचे उद्घाटन


पुणे/ प्रतिनिधीः
दोन सरकारी विभागांमधील वादाचा अनुभव सर्वसामान्यांना नेहमीच येतो; पण आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दोन विभागांमधील वादावर भाष्य केले आहे. राज्यातील सरकारी विभागांमध्ये भारत-पाकिस्तानसारखे संबंध पाहायला मिळतात, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला. पुण्यात मात्र पालिका, पोलिस आणि जिल्हाधिकार्‍यांच्या कामात चांगला समन्वय पाहायला मिळतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेवा संकुलाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम तसेच पोलिस अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, की भविष्यात पुणे पोलिसांच्या ‘भरोसा सेल या विभागामार्फत अनेक कुटुंबांतील वाद मिटण्यास मदत होईल. विशेषत: एखाद्या महिलेस कोणत्याही प्रकारची असुरक्षितता वाटली, तर या भरोसा सेलच्या माध्यमातून मदत होईल आणि त्यांचे प्रश्‍न मार्गी लागतील. तसेच तांत्रिक गोष्टीमध्ये पोलिसांनी न जाता प्रथम समुपदेशन केल्यास अधिक प्रश्‍न सुटतील. इंग्रजांच्या काळात पोलिस हे राज्य करण्यासाठी होते; मात्र आजच्या काळात पोलिस हे राज्य करण्यासाठी नसून सेवा देण्यासाठी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

पुणे शहरातील पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत असताना बापट यांनी पूर्वीच्या काळात पोलिसांना मामा म्हणायचे; पण आता नागरिक मामासाहेब म्हणतात, यातून त्यांचा मान वाढला आहे, असे विधान केले. त्यांच्या या विधानाने सभागृहात एकच हशा पिकला.

विश्‍वास आणि भरोसा निर्माण करा
पोलिसिंग करताना नागरिकांमध्ये भीती वाटता कामा नये. नागरिकांमध्ये विश्‍वास आणि भरोसा निर्माण करावा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिला.