Breaking News

मांढरदेवला वाद्य, नारळ, तेल वाहण्यास बंदी

सातारा (प्रतिनिधी): मांढरदेव येथील श्रीकाळेश्‍वरी देवीची यात्रा दि. 20 ते 22 जानेवारी या कालावधीत होत आहे. यात्राकाळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहून सन्मवय ठेवून काम करावे, अशा सूचना करुन यात्रा कालावधीत पशुबळी, दारुबंदीसह नारळ फोडण्यास तसेच तेल वाहण्यास आणि वाद्ये वाजविण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे, भाविकांनी पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज केले.

मांढरदेव येथील श्रीकाळेश्‍वरी देवीच्या वार्षिक यात्रेच्या नियोजनसदंर्भात आज जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक झाली, त्यात त्या मार्गदर्शन करीत होत्या. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापूरकर, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, वाईचे तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी यावेळी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचे शुध्दीकरण, तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता, जंतुनाशक औषध फवारणी, त्याचबरोबर रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. कचरा होऊ नये यासाठी दर्शन मार्गावर जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात येणार आहेत. खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी ठराविक ठिकाणी होऊ नये, यादृष्टीने स्टॉलधारकांच्या जागांचे नियमन करावे. अन्नधान्यांच्या स्टॉलला परवानगी देतांना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक करावे. मांढरदेव परिसरात वाद्ये वाजविण्यास, नारळ फोडण्यास आणि तेल वाहण्यास पूर्णतः बंदी करण्यात आली आहे. भाविकांनी याचे पालन करुन पोलिस यंत्रणेला आणि जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी यावेळी केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे भरुन दुरुस्त केले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक कठडे तयार करण्यात येत आहेत. ज्या बाबी अजूनही अपूर्ण आहेत त्या तत्काळ पूर्ण कराव्यात. सर्व विभागांनी सतर्क राहून एकमेकांच्या समन्वयाने काम करा. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून अशा घटना घडूच नयेत म्हणून आधीपासूनच काळजी घ्यावी. यात्रा काळात समस्या, अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केल्या.