Breaking News

दखल- कर्नाटकच्या खुर्चीला सुरुंग


भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युती केली खरी; परंतु सत्ता येऊन आठ महिनेही होत नाहीत, तोच तिथं कुरबुरी सुरू झाल्या आहेत. सत्ता टिकविण्याची जबाबदारी आपली असल्याचं सांगणारे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडं समन्वयाची जबाबदारी आहे;परंतु तेच सरकारला स्थिर होऊ देत नाहीत.
कर्नाटकात काँग्रेसची सत्ता होती. जनतेनं काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्याइतपत बहुमत दिलं नाही. भाजपचा उद्दामपणा आणि उन्मतपणा पाहून त्या पक्षाकडंही सत्ता जाणार नाही, याची दखल जनतेनं घेतली. भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही त्या पक्षाला बहुमत सिद्ध करता आलं नाही. काँग्रेसला 78 जागा मिळूनही त्यापेक्षा निम्म्याहूनही कमी जागा असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला मुख्यमंत्रिपद आणि अन्य महत्त्वाची पदं द्यावी लागली. सत्तेसाठी मोठ्या भावाला लहान भावाची भूमिका वठवावी लागली. कुमारस्वामी हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर धर्मनिरपेक्ष जनता दलावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा सारखा दबाव वाढतो आहे. ठराविक पदं आणि कामांबाबतही काँग्रेस दबाव आणीत असल्याचा आरोप आता थेट कुमारस्वामी यांनी केला आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलानं त्यांच्या वाट्याची पदं कमी शिकलेल्यांना दिली, त्यावरूनही काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपद गेल्याचं दुःख आहे. ते अधूनमधून तशी भावना व्यक्त करतात. त्यांना ते आता मिळणार नाही, हे माहीत असतानाही काँग्रेसच्याच मदतीनं सत्तेवर आलेलं सरकार कायम अस्थिर कसं राहील, यासाठी त्यांची धडपड आहे. कुमारस्वामी आणि सिद्धरामय्या यांच्यातून विस्तव जात नसला, तरी लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत सरकार टिकविण्याचा प्रयत्न राहील, असं दिसतं. राहुल गांधी व एच. डी. देवेगौडा यांच्यात चांगले संबंध आहेत. आता सरकार कोसळलं, तर त्याचा परिणाम लोकसभेच्या महागठबंधनावर होऊ शकतो, याची जाण राहुल यांना आहे. त्यामुळं ते अतिशय सावधपणे पावलं टाकीत आहेत. दुसरीकडं काँग्रेसमधील आमदारही दबावाचं राजकारण करीत आहेत. आघाडीचं सरकार असल्यानं काँग्रेसच्या आमदारांना हवी ती पदं मिळाली नाहीत. काहींना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं आहे. त्यामुळं ते नाराज आहेत. त्यांच्या या नाराजीचा फायदा भाजप उठवीत आहे. पक्षांतर केलं, तर मोठ्या पदाचं तसंच कोट्यवधी रुपयांचं आमिष दाखविलं जात आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांच्या मागं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं तसंच अंमलबजावणी संचालनालयाचं शुक्लकाष्ठ लावून देण्यात आलं आहे. हे सर्व आमदारांना गळाला लावण्यासाठी होत आहे. एकीकडं ही स्थिती असताना दुसरीकडं कुमारस्वामी यांच्यामागं उभं राहण्याऐवजी सिद्धरामय्या यांच्यासारखे नेते सरकार अस्थिर करण्याला हातभार लावीत आहेत. कुमारस्वामी यांना नीट कारभार करू दिला जात नाही. त्यामुळं आता कुमारस्वामी यांनीही सरकार गेलं, तरी चालेल अशी भूमिका घेतल्यानं काँग्रेसची गोची झाली आहे.
प्रदेश काँग्रेसवर वचक ठेवण्याच्या नादात समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी सरकारवर हक्क गाजविण्याचा प्रयत्न करत आहेत. यापुढं सरकार कोसळलं तरी चालेल; पण आणखी सहन करणार नसल्याची नाराजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आपल्या निकटवर्तीयांसमोर व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धरामय्या हे सरकारवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या धोरणामुळं आपल्या पक्षाचा बळी देणार नाही. आपल्या मर्जीतील आमदारांना त्यांनी मंत्रिपदी बसविलं आहे. त्यामुळं सरकारवर त्यांचा प्रभाव राहणार हे निश्‍चित आहे. आगामी काळात होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सरकारचा वापर होणार असल्यानं मुख्यमंत्री म्हणून आपलीच बदनामी होण्याची भीती कुमारस्वामी यांना आहे. सत्तेवर आल्यानंतर शेतक-यांची कर्जमाफी, फेरीवाल्यांना छोट्या रकमेचं कर्ज आदी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तरीही आपलं नाव वाईट झालं तर काय करायचं, अशी भीती त्यांनी निकटवर्तीयांसमोर व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. सुमारे 15 आमदार अजूनही भाजपप्रवेशाच्या तयारीत आहेत. ते गेले तरी आता काळजी नाही. त्यांना अडविणार नाही. गेल्या सात महिन्यांपासून मुख्यमंत्रिपदी राहून चांगलं कार्य केलं आहे. जनतेच्या हितासाठी दिवसरात्र परिश्रम घेत असताना धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून काँग्रेसवर दबावाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दररोज केला जात आहे. यापुढं असं ऐकून घेणं आता अशक्य आहे. आता सरकार कोसळलं, तरी कोणतीच काळजी नसल्याचं दु:ख त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे व्यक्त केल्याचं समजतं. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असणारे सुमारे 8 आमदार काँग्रेसच्या संपर्काबाहेर आहेत. त्यामुळं काँग्रेस- धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी सरकारमधील तळमळ वाढली आहे. गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यासह सर्व नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.

 जारकीहोळींसह बेळगाव जिल्ह्यातील तीन आमदार, बळ्ळारीचे दोन आमदार आणि रायचुरातील एक आमदार काँग्रेससाठी ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. त्या सर्व आमदारांना एकत्र आणून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला; मात्र त्यात अपयश आलं. संक्रांतीनंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल होणार असल्याचं वृत्त पसरल्यानंतर नाराज आमदारांनी भाजपशी जवळीक साधली आहे.

बेळगावातील राजकारण थंड झाल्यानंतर आता बळ्ळारीतील राजकारण तापलं आहे. आमदार बी. नागेंद्र यांनी मंत्रिपदासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला; पण त्यांना अपयश आलं. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते काँग्रेसच्या संपर्काबाहेर आहेत. जारकीहोळींसह नाराज आमदारांच्या गुपचूप हालचाली सुरू आहेत. सगळ्यात कमी जागा असूनही धर्मनिरपेक्ष जनता दलाला मुख्यमंत्रिपद मिळालं. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलामध्ये सगळं काही अलबेल आहे, असं दिसत नाही. त्यामुळं हे सरकार पडेल अशी शक्यता वाटत आहे. कुमारस्वामी यांनीच मी किती दिवस मुख्यमंत्री असेल, याची शाश्‍वती नाही, असं सांगितलं. मी जेवढे दिवस राहील आपल्या कामांनी भविष्य सुरक्षित करेल. हे त्यांचं वक्तव्य पुरेसं बोलकं आहे. कुमारस्वामी यांच्या या वक्तव्याच्या एक दिवस आधी सिद्धारामय्या यांनी म्हटलं होतं की, ते पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात. हासनमधील एका सभेत सिद्धारामय्या यांनी म्हटलं, की ’जनतेच्या आशिर्वादानं मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होईल. याआधी कुमारस्वामी तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी म्हटलं होतं, की मुख्यमंत्री बनून मी विष पित आहे. त्यामुळं हे सरकार पडतं की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर स्थानिक निवडणुकांमध्ये तेव्हा दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली, तेव्हादेखील दोन्ही पक्षांमधील मतभेद समोर आले होते.
भाजप कर्नाटकमध्ये 104 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. पण बी. एस. येदियुरप्पा विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करु शकले नाहीत आणि त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसनं निकालानंतर लगेचच धर्मनिरपेक्ष जनता दलाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एचडी कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले होते. काँग्रेसकडं 78 आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 37 आमदार आहेत. कर्नाटकातील सरकारात निर्माण झालेल्या गोंधळापासून सुरक्षित अंतरावर असलेले भाजपचे केंद्रीय नेते आता प्रथमच थेट रिंगणात उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकातील आघाडीचं सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी अस्थिर करून भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे; परंतु काँग्रेसमधील आमदारांची अपेक्षित संख्या मिळत नसल्यानं दिरंगाई होत असल्याचं समजतं. राज्यातील भाजप नेत्यांनी कितीही सांगितलं तरी, कर्नाटकातील आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रातील भाजप नेत्यांनी त्याकडे दुर्लक्षच केलं होतं. आघाडी सरकारातील दोन्ही पक्षांचे आमदार स्वत:हून रस्त्यावर येईपर्यंत सरकार अस्थिर करण्याचे कोणतेच प्रयत्न न करण्याची त्यांनी स्पष्ट सूचना दिलेली होती; परंतु आता योग्य परिस्थिती निर्माण झाल्याचं भाजपला वाटतं आहे. मंत्रिमंळ विस्तारानंतर मंत्रिपद गमविलेले रमेश जारकीहोळी यांनी राज्य सरकारविरुद्ध बंडाचं निशाण हाती घेतलं आहे. गेले 10 दिवस ते कोणत्याच काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात नव्हते. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडूराव, बंधू सतीश जारकीहोळी, लखन जारकीहोळी यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केला, तरी त्यांचा संपर्क होऊ शकला नव्हता. आता काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा लाभ उठविण्याचा भाजपने प्रयत्न चालविला आहे. किमान 13 ते 16 आमदारांना वश करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वाल्मीकी समाजाच्या एका प्रभावी मंत्र्यांमार्फत काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांना फोडण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत; परंतु आमदारांची अपेक्षित संख्या मिळत नसल्यानं ऑपरेशन कमळ काहीसं मागं पडलं आहे. केवळ तीन-चार आमदार बाहेर पडल्यास सरकारला धोका पोहोचणार नाही. भाजपलाही त्याचा लाभ मिळविता येणार नाही. किमान 15 आमदार एकाच वेळी बाहेर पडल्यास सरकार अस्थिर करता येईल, या विचारात भाजप नेते आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारचं पतन न झाल्यास लोकसभा निवडणुकीत राज्यात अपेक्षित यश मिळविता येणार नाही, यासाठी सरकारचं लवकर पतन होण्याच्यादृष्टीनं हालचाली सुरू आहेत.
काँग्रेस पक्ष सोडून आम्ही कोठेच जाणार नसल्याचं आमदार सांगत असले तरी पक्षाला ‘हात’ दाखविण्याची त्यांनी मानसिक तयारी केली असल्याचं समजतं. असंतुष्ट आमदारांना गुप्त ठिकणी एकत्र करून त्यांना एकाच वेळी दिल्लीला नेण्याची व भाजपत प्रवेश घडवूण आणण्याची जबाबदारी भालचंद्र जारकीहोळी यांनी स्वीकारली असल्याचं समजतं. बळ्ळारीचे बी. नागेंद्र, आनंद सिंग, गणेश, प्रताप गौड पाटील, बसवराज दद्दूर, बी. सी. पाटील, बी. के. संगमेश, महंतेश कुमुटहळ्ळी, श्रीमंत पाटील यांच्यासह सुमारे 12 आमदार रमेश जारकीहोळी यांच्या संपर्कात आहेत. मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर अज्ञातवासात जाऊन पक्षविरोधी कारवाया करणारे माजी मंत्री रमेश जारकीहोळी गोकाकमध्ये प्रगट झाले आहेत. तब्बल 10 दिवसांनंतर रमेश जारकीहोळी गोकाकला परतले. मंत्रिपद गेल्यानंतर भाजपशी सलगी वाढवून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय असलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याबाबत कठोर भूमिका घेण्याचा निर्धार काँग्रेसनं केला आहे. नाराजी वा काही समस्या असेल, तर थेट पक्षश्रेष्ठी किंवा काँग्रेसचे राज्य प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करण्याची सूचना प्रदेश काँग्रेस समितीने त्यांना केली आहे. जारकीहोळी यांच्यासोबत कुणीच आमदार नसल्याची खात्री पटल्यानंतरच काँग्रेसनं त्यांच्याशी कठोर वागण्याचा निर्णय घेतला आहे. कुमारस्वामी मंत्रिमंडळात जारकीहोळी नगरप्रशासन मंत्री होते. मंत्रिमंडळ पुनर्रचनेत त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून ते पक्षापासून अंतर ठेवून आहेत. उलट भाजपशी सलगी वाढवून त्यांनी राज्यातील आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यांचे बंधू व विद्यमान मंत्री सतीश जारकीहोळी यांनी गोकाकला भेट देऊन रमेश यांच्याशी चर्चा केली. याबाबतचा अहवाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांना सादर केला. त्यानुसार ते आता पक्षात राहणार नसल्याचा अंदाज आहे. ते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात;परंतु त्यांचाही सल्ला ते मानण्यास तयार नाहीत. यासाठी पक्षानं आता ताठर भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार कायम आहे.