Breaking News

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सातार्‍यात सुरू


सातारा (प्रतिनिधी)- आज प्रत्येकास व्यक्तिमत्त्च विकास घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. आपल्या विशाल भारतात अनेकजण शिक्षणापासून वंचित आहेत. मात्र प्राप्त शिक्षणातून शोध व संशोधन होणे महत्वाचे आहे, तरच आईनस्टाईन, न्यूटन यांच्यासारखे प्रगल्भ संशोधक आपल्या देशातूनही निर्माण होतील, असे उदगार खा. उदयनराजे भोसले यांनी काढले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, सातारा जि. प. शिक्षण विभाग व येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उभारण्यात आलेल्या डॉ. सी. व्ही. रामण शास्त्रनगरीत आयोजित 44 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते मार्गदर्शन करीत होते. उदघाटन सोहळयास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, डॉ. अविनाश पोळ, शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या संस्थापकांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन अनोख्या पध्दतीने तुळशीच्या झाडाला पाणी घालून आणि आकाशात फुगे सोडून करण्यात आले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दरवर्षी जिल्हास्तरावर हे वैज्ञानिक प्रदर्शन घेण्यामागे नव्या पिढीत वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा. शालेय स्तरावर बालवैज्ञानिकांचा शोध घ्यावा या माध्यमातून आयोजित करण्यात येते. आज या प्रदर्शनात 11 तालुक्यातून प्राथमिक व माध्यमिक स्तर आणि शिक्षक व प्रयोगशाळा परिचर यांची एकूण 121 उपकरणे 16 वर्गात मांडण्यात आली आहेत. त्यातून नव्या पिढीने साकारलेल्या संकल्पना व शोधांची सर्व जिल्हावासियांनी प्रदर्शनास भेट देवून अवश्य पाहणी करावीत, असे आवाहनही केले.यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी व परिचय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप यांचीही भाषणे झाली.विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना उदयनराजे भोसले म्हणाले, दुरदृष्टी ठेवून जिद्दीने अभ्यास करा. व्हिडीओ गेम्सला दूर ठेवून मैदानी खेळ खेळा. कारण आपण मोठे होताना ध्येयाची उंची गाठण्याचा प्रयत्न करूया. शक्ती व युक्तीची सांगड घातली तरच उच्चांक गाठू शकतो. 38 हजार किमी अंतरावर असलेल्या चंद्रावर आज माणूस जात आहे. तुम्हीही चांगले शिक्षण घेवून भरारी मारा. कारण वेळ ही परत येणार नाही. शुन्यातून विश्‍वनिर्मिती करताना आकाशाएवढे मोठे व्हा. डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांच्या मनोगतात नवकल्पनांचा विचार देत संशोधन केल्यास जीवनात मोठे बदल होतील. शिक्षकांनीही विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे उपक्रम मोलाचे आहेत, असे सांगितले.जि.प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वैज्ञानिक प्रदर्शनासाठी आपण पुढील वार्षिक सभेत 3 लाखाचा निधी वाढवून 7 लाख करण्यासाठी निर्णय घेवू,असे सांगितले. कार्यक्रमास जिपच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती सौ. वनिता गोरे, जि. प. सदस्या सौ. भाग्यश्री मोहिते, शालाप्रमुख सौ. स्नेहल कुलकर्णी, शाला उपप्रमुख डी. एस. कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाळांतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. उदघाटन सेाहळयापूर्वी न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींनी शहरातून ढोल ताशांच्या गजरात विज्ञान दिंडी काढली. विज्ञान दिंडीचा प्रारंभ उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी मंगल मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. विज्ञान दिंडीत ठेवलेल्या पालखीतील निवडूंगाचे झाड, परीक्षानळी, सेल, चंचुपात्र आदी उपकरणे लक्षवेधक ठरले.