Breaking News

बेस्टच्या एकाही कर्मचार्‍यांची नोकरी जाणार नाही : ठाकरे


मुंबई : बेस्ट हा मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय असून कर्मचार्‍यांच्या संपावर चर्चेतून मार्ग काढावा. संपात सहभागी झालेल्या एकाही कर्मचार्‍याची नोकरी जाऊ देणार नाही, असे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. बेस्टची आर्थिक स्थिती खराब असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ज्या काही सुधारणा गरजेच्या आहेत. त्याचा विचार करूनच विलनीकरणाचा निर्णय घेतला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
गेल्या 6 दिवसांपासून बेस्टचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आज उच्चस्तरीय कमिटीची बैठक मुख्य सचिवांच्या दालनात पार पडली. सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी तोडगा निघू शकलेला नाही. बेस्टच्या संपाचा आज शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महाअधिवेशनालाही फटका बसला. या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

बेस्टच्या संपात राजकारण आणण्याची माझी इच्छा नाही. एकमेकांवर आरोप करून काही होणार नाही. संपाबाबत कामगार कृती समिती आणि अधिकार्‍यांनी एकत्रित बसून चर्चा केली तर मार्ग निघेल, असेही ते यावेळी म्हणाले. बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प विलीन करण्याच्या मागणी त्यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, की सध्या बेस्टची आर्थिक स्थिती खराब आहे. बेस्टचा तोटा कसा कमी करता येईल यावर विचार करून अंतिम निर्णय घेण्यात घेऊ. कंत्राट पद्धत वापरण्यावर विचार होत असला तरी यात कोणत्याही कर्मचार्‍याची नोकरी जाऊ देणार नाही, असे आश्‍वासन दिले.