Breaking News

डॉ. सुजय विखे मिठाई वाटणारे स्वयंघोषीत उमेदवार; शिवसेनेचे उमेदवार घनश्याम शेलार यांची टिका


अहमदनगर/प्रतिनिधी
शिवसेनेची उमेदवारी मला निच्छित झाली आहे. मात्र, काही उमेदवार गुढग्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तर काँग्रेस व राष्ट्रवादीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसताना दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वयंघोषीत उमेदवार डॉ. सुजय विखे हे मिठाईचे बॉक्स वाटत फिरत आहे. अशी टिका शिवसेनेचे समन्वयक घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजवर जो आदेश दिला, तो आम्ही पाळला आहे. इतरांप्रमाणे आम्ही पक्षादेश पायंदळी तुडवत नाही. पक्षाने सांगितले तर आम्ही युतीला साथ देऊ, निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आता तयारीला लागलो आहोत. मी एक सामान्य कार्याकर्ता आहे. मी कुणाचा नातू, पणतू, मुलगा किंवा बड्या घरचा नाही. त्यामुळे बंड पुकारण्याची वेळ आमच्यावर आली नाही. असा टोला त्यांनी डॉ. विखे यांना लगावला. विखे घराने हे स्वत:हुन निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. त्यांनी गावोगावी मिठाईचे वाटप करणे सुरू केले आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीत अद्याप जागा वाटपाहुन वाद सुरू आहे. शिवसेनेचा कारभार साफ आहे. त्यामुळे आम्ही प्रथमत: उमेदवार घोषीत केला आहे. मात्र, अद्याप भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही.
वास्तविक पाहता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ धनशक्तीला भीक घालणारा नाही. त्यामुळे पक्षप्रमुखांनी ही लोकसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे व नगर दक्षिणमधून घनश्याम शेलार यांची घोषणा करण्यात आली आहे. नगरचे राजकीय वातावरण पाहता भाजप व शिवसेना यांच्यात युती होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे आमची तयारी सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून दक्षिणेच्या विकासावर आम्ही लढत आहे. सकळाईचा विषय 1997 साली आम्ही समोर मांडला. शासनाशी झगडून कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, त्यानंतर त्यावर केवळ राजकारण झाले. उद्या शिवसेनेला संधी मिळाली तर, पहिला प्रश्‍न सकळाईचा मार्गी लावला जाईल. असे शेलार यांनी अश्‍वासन दिले.
चौकट
बँकेचे लौकीक सोडून त्यांनी काय केले?
खा. दिलीप गांधी यांनी दोन वेळा खासदारकी भोगली. मात्र, दक्षीणेतील पाणीप्रश्‍न, पुणे-नगर महामार्ग, नगर-मुंबई रेल्वेमार्ग, प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी, बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सर्व काही प्रलंबित आहे. खा. गांधी यांना बँकेचे लौकीक सोडून काय सुचले? हे त्यांनीतरी देखवुन द्यावे. असे सवाल शेलार यांनी केला.


चौकट
काय असेल शिवसेनेच्या अजेंड्यावर
शेतकर्‍यांना कर्जमाफी सांगून फसविले, पिक विमा योजना, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाला आधार देणे, दुष्काळग्रस्तांना मदत करणे, सकळाईचा प्रश्‍न मार्गी लावणे, प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी, कुकडीच्या पाण्याचा प्रश्‍न, नगर-मुंबई रेल्वेमार्ग, पुणे-नगर महामार्गावरील कोंडी, नगर दक्षिणचा औद्योगिक विषय, तरुणांसाठी रोजगार असे अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी शिवसेना कार्यरत राहील.