Breaking News

यूएईकडून भारताचा पराभव


अबु धाबी : गोल करण्याच्या पाच सुवर्णसंधी दवडल्याने भारताला येथे सुरू असलेल्या एएफसी आशियाई चषक स्पर्धेत यजमान संयुक्त अरब अमिरातकडून 0-2 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला. यजमान अमिरातचे गोल खल्फान मुबारक (41 वे मिनिट) व अली अहमद मब्खूत (88) यांनी नोंदवले. गट अ मधील पहिल्या सामन्यात त्यांना बहरिनने 1-1 असे बरोबरीत रोखले होते. त्यामुळे भारताविरुद्ध त्यांच्यावर विजय मिळविण्याचे दडपण होते. भारताने या सामन्यात त्यांच्यापेक्षा सरस खेळ केला. पण अचूक फिनिशिंग होऊ न शकल्याने भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. 

गट अ मध्ये अमिरात संघाचे दोन सामन्यांतून 4 गुण झाले आहेत तर दुसऱया स्थानावरील भारताचे दोन सामन्यांत 3 गुण झाले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात थायलंडचा 4-1 असा धुव्वा उडविला होता. थायलंडने दुसऱया सामन्यात बहरिनवर 1-0 असा विजय मिळवित गाडी पुन्हा रूळावर आणली आहे. भारताने पूर्वार्धात तीन आणि उत्तरार्धात दोन सुवर्णसंधी गमविल्या. सदोष नेमबाजीमुळे यातील काही फटके गोलपोस्टजवळून बाहेर गेले तर एकदा सुनील छेत्रीचा फटका यजमानांच्या गोलरक्षकाने अचूक थोपविला. प्रारंभी बॉल पझेशनच्या बाबतीत अमिरात संघ सरस होता. पण गोलच्या दिशेने पहिला फटका मारला तो भारताने. गोलच्या चांगल्या संधी गमविल्याने भारताला हा सामना गमवावा लागला.