Breaking News

गेंडामाळ कब्रस्तानच्या जागेवरील आरक्षण उठवण्यासाठी सहकार्य करणार : आ. भोसलेसातारा, (प्रतिनिधी) : शाहपुरीलगत गेंडामाळ येथे मुस्लीम समाजाची कब्रस्तानाची जागा आहे. तेथे मृत व्यक्तींचे दफन केले जाते. दरम्यान, या जागेवर नगरपालिकेने बगीचासाठी आरक्षण टाकले आहे. हे आरक्षण उठवणे आवश्यक असून मुस्लीम समाजाचा हा प्रश्‍न सोडवण्यासाठी, गेंडामाळ कब्रस्तानच्या जागेवरील आरक्षण उठवण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करु, असे आश्‍वासन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुस्लीम बांधवांना दिले.

येथील गेंडामाळावरील मुस्लिमांच्या कब्रस्तानाच्या काही खुल्या जागेवर उद्यानाचे, बगिचाचे आरक्षण नगरपालिकेने टाकले आहे. ते आरक्षण उठवण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी मुस्लीम समाजाबांधवांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेवून तसे लेखी निवेदनही त्यांना दिले. यावेळी आ. भोसले बोलत होते. यावेळी गेंडामाळ कब्रस्तान अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष आरीफ शेख, इरफान बागवान, मुख्तार पालकर, इम्रान पालकर, मुस्ताक सय्यद, इफ्तेखाब बागवान, युसूफ शेख, अस्मल कुरेशी, माजी नगराध्यक्ष नासिर शेख, मुबीन कलाल, इम्रान कलाल, अन्सार आतार, फिरोज पठाण, बिलाल शेख, दिलावर शेख, महंमदअली बागवान यांच्यासह विरोधी पक्षनेते अशोक मोने, राजू गोरे, चंदन घोडगे, विलास कासार, बबलू केंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मुस्लीम बांधवांनी आपली समस्या मांडताना गेंडामाळ कब्रस्तान जागेवर नगर परिषदेने टाकलेले बगीचाचे आरक्षण चुकीचे आहे. हे आरक्षण तातडीने उठवणे आवश्यक आहे. आरक्षण न उठवल्यास मुस्लीम समाजाला भविष्यात गंभीर समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हे आरक्षण तातडीने उठवून मुस्लीम समाजाला दिलासा द्यावा, अशी मागणी उपस्थित समाज बांधवांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोधी पक्षनेते अशोक मोने यांना आरक्षण उठवण्यासाठी पालिका प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याची सुचना केली. तसेच तातडीने आरक्षण उठवण्यासाठी आपण वाट्टेल ते सहकार्य करु, असे आश्‍वासन उपस्थित मुस्लीम बांधवांना दिले.