Breaking News

व्हॉटसअ‍ॅपवर अश्‍लील छायाचित्रे पाठवणार्‍यावर गुन्हा


सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : येथील एका महिलेच्या व्हॉटसअ‍ॅपवर अश्‍लील छायाचित्रे पाठविल्याप्रकरणी दोन मोबाईल धारण करणार्‍या अज्ञातावर सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या एका गावात 31 वर्षीय एक महिला राहण्यास असून त्याच परिसरात ती ब्युटीपार्लर चालवते. सदर ठिकाणी व्यवसाय करत असतानाच त्या महिलेच्या व्हॉटसअ‍ॅपवर अज्ञात व्यक्तीने अश्‍लील छायाचित्रे पाठविण्यास सुरुवात केली. सुरुवातीस त्याकडे संबंधित महिलेने दुर्लक्ष केले, मात्र नंतर अश्‍लील छायाचित्रे येण्याच्या प्रमाणात वाढ होवू लागली. वारंवार अश्‍लील छायाचित्रे पाठवून त्या अज्ञात व्यक्तींकडून संबंधित महिलेस त्रास दिला जात होता. अश्‍लील छायाचित्रे पाठवण्याचे सत्र सुरू असतानाच नंतरच्या काळात त्याने महिलेस फोन करून त्रास देणे सुरू केले. वारंवार होणार्‍या त्रासामुळे संबंधित महिला घाबरली होती. त्यामुळे तिने याबाबतची तक्रार सोमवारी रात्री सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानुसार अज्ञाताविरूध्द विनयभंग तसेच आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव करीत आहेत.