Breaking News

पालिकेच्या पोट निवडणूकीचा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म संदीप क्षीरसागरांकडे!


बीड : प्रतिनिधी
बीड पालिकेच्या प्रभाग क्र.११ अ ची पोट निवडणूक होत आहे. या निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने येथील राष्ट्रवादीचे युवा नेते संदीपभैय्या क्षीरसागर यांच्याकडे पाठवण्यात आला. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळावा म्हणून अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतू संदीपभैय्या क्षीरसागर यांना पक्षाने निष्ठेच फळ देत बीड विधानसभेसाठी तयारीला लागण्याचा एक प्रकारे संदेशच दिला असल्याचे बोलले जात आहे. 


माजी आ.सय्यद सलीम, माजी आ. राजेंद्र जगताप, ऍड.डी.बी. बागल यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख पदाधिकार्यांच्या, नगरसेवकांच्या उपस्थितीत पक्षाचा एबी फॉर्म जोडून अधिकृत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रभोदय मुळे, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, साठे यांच्याकडे देण्यात आला. 
बीड पालिकेच्या प्रभाक क्र. ११ अ साठी पोट निवडणूक होत असून २७ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बुधवार दि.९ जानेवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होतो. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म कोणाला मिळतो याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या होत्या. बीड विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणूकीकडे पाहिले जात आहे. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म ज्यांच्याकडे असेल तेच विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असतील असा अंदाज बांधल्या जात असतांना पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब, आ. छगन भुजबळ साहेब, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. अजितदादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, आ. सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित, राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, ऍड. बागल, गटनेते फारुक पटेल यांनी संदीपभैय्यांना पक्ष एकनिष्ठेचे फळ देत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सुपूर्द केला. यावरुन संदीपभैय्यांना एक प्रकारे बीड विधानसभेसाठी तयारी लागण्याचा आदेशच दिल्याचे बोलले जात आहे.

पक्ष श्रेष्ठींनी दिलं संदीपभैय्यांना निष्ठेचं फळ

बीड पंचायत समिती, जिल्हा परिषद ताब्यात येत असतांना पक्षा सोबत गद्दारी करुन ही सत्ता स्थाने ताब्यात घ्यायची नाहीत, पक्षासोबत एकनिष्ठ राहयचं अशी कणखर भूमिका आज पर्यंत जि.प.सदस्य संदीपभैय्या क्षीरसागर यांनी घेतलेली आहेत. कार्यकर्त्यांनाही त्यांनी हीच भूमिका घ्यायला लावली. संदीपभैय्यांनी पक्षासाठी केलेल्या त्यागाचं आज एक प्रकारे चिज झालं अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. पोट निवडणूकीत पक्षाचा एबी फॉर्म देत पक्ष श्रेष्ठींनी विधानसभेसाठी तयारी लागण्याचा एक प्रकारे आदेशच दिल्याचे देखील बोलले जात आहे.