Breaking News

युवक, युवतींना थॅलेसेमिया आजाराबाबत जागृती होणे गरजेचेः आ.स्नेहलता कोल्हे


कोपरगाव/प्रतिनिधी 
आरोेग्यशास्त्र प्रगत झाले असुन भविष्यात आपल्या पुढील पिढीच्या सुदृढता व सुरक्षिततेसाठी थॅलेसेमिया आजारचे निदान करणे गरजेचे आहे. आई आणि वडील दोघेही थॅलेसेमिया मायनर आजारने बाधित असेल तर त्यांचे होणारेे अपत्य हे थॅलेसेमिया मेजर आजारने बाधित जन्माला येते. या आजारामुळे बाळाच्या शरीरात रक्त तयार होवु शकत नाही आणि अशा बाळाला बाहेरून रक्त पुरवावे लागते. म्हणुन अशा समस्या भविष्यात निर्माणच होवु नये यासाठी प्रत्येकाने विवाहापुर्वी थॅलेसेमियाची जागृती होणेे गरजेचे आहे. असा सल्ला आ. स्नेहलता बिपीन कोल्हे दिला.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि ऋतुजा फाऊंडेशन, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या सोलर पार्कमध्ये 5224 विद्यार्थी अणि कर्मचार्‍यांची थॅलेसेमिया मायनर, रक्तातील हिमामग्लोबिन आणि रक्त गट अशा तपासण्या एकाच दिवशी करण्यात आल्या व एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी तपासण्या केल्याने संजीवनी शैक्षणिक संकुलातील या उपक्रमाचा जागतिक उच्चांक प्रस्थापित झाला आहे. ग्लोबल रेकॉर्डस अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनचे भारतातील अध्यक्ष श्री. मनमोहन रावत व निवाडा अधिकारी सुबोध रावत यांनी हा जागतिक उपक्रम नोंदवल्याचे जाहिर केले. विद्यार्थी व कर्मचार्‍यांच्या वरील प्रमाणे तपासणी दरम्यान आ. कोल्हे यांनी भेट देवुन विद्यार्थी व कर्मचार्‍यांच्या प्रकृतीची चौकशी केली. याप्रसंगी आ. कोल्हे यांनी आपले विचार व्यक्त केले. या संपुर्ण दिवसभरात नितीन कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे यांनी विद्यार्थी व कर्मचार्‍यांचे तपासणीसाठी रक्त घेतल्यावर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवु नये. यासाठी पुरेपुर काळजी घेतली. भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद थोरात यांनीही या भव्य शिबिरास भेट देवुन विद्यार्थ्यांची चौकशी केली. अंजली केवल यांच्या उपक्रमास हिंद लॅब, अहमदनगरच्या कर्मचार्‍यांसह जिल्हा समन्वयक विश्‍वजीत नरवडे, जिल्हा रूग्णालय, शांतीकुमारजी फिरोदिया, मेमोरीयल फाऊंडेशन व त्यांचे प्रतिनिधी घानेकर, सकाळ फाऊंडेशन आणि नीता पाटील यांनी मोलाची साथ दिली.

याप्रसंगी डॉ. केवल यांनी थॅलेसेमिया विषयी अधिक माहिती देताना सांगितले की हा आजार रक्ताशी संबंधित अनुवांशिक विकार आहे. हा आजार मातापित्यांकडुन मुलांकडे संक्रमित होतो. भारतातील 4 टक्यांपेक्षा अधिक लोकांना थॅलेसेमियाचा धोका संभवतो. यावेळी त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी ऋतुजा ही थॅलेसेमियाची मेजर वर्गातील रूग्न आहे. या आजाराला सामोरे जाताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. भविष्यात इतरांच्या वाट्याला असे दुःख जावु नये म्हणुन त्यांनी थॅलेसेमिया मुक्त भारत हे अभियान राबवुन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.