अच्छे दिन जाने वाले है !अच्छे दिन आने वाले है या घोषणेवर निवडून आलेल्या सरकारचा कार्यकाळ जवळपास संपला आहे. हा कार्यकाळ हाहा म्हणता सरला असं म्हणायची मात्र सोय नाही. या कार्यकाळात घडलेल्या अनेक घटनांमुळे देश ढवळून निघाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मातृसंघटना समजणार्‍या भाजपसारख्या पक्षाला स्वबळावर देशाची सत्ता हाती आली. ती हाती आणून देण्यास कारणीभूत ठरले ते जाज्ज्वल्य हिंदुत्वाला विकासाच्या कोंदणात बसवल्याचा आभास निर्माण करणारे नरेंद्र मोदी. गुजरात दंग्यांमध्ये हजारोंचा मृत्यू झाला, अनेक स्त्रियांवर बलात्कार झाले, अपरिमित मालमत्तेचे नुकसान झालं, त्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची कमान ज्यांच्या हाती होती अशी व्यक्ती! मात्र त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहताना त्यांच्यावर असलेला हा दंग्यांचा डाग धुवून काढला तो विकासाच्या नावावर. गुजरातमध्ये प्रचंड वेगाने विकास केल्याचे बोलले जाऊ लागले. त्यावर शिक्कामोर्तब केले ते राजीव गांधी फाऊंडेशननेच त्यांना विकासाबाबत पारितोषिक देऊन. मोदींच्या विकासाचा हा ढोल इतका पिटला गेला की, देशातील लहान थोरांच्या तोंडी मोदींचा विकास हा एकच विषय होऊन बसला. माणसं मरणं, मारणं हे काय जगात सुरूच असतं जणू. विकासाची गंगा धोधो वाहायला लागली त्याचं काय ते बोला, असं भले भले म्हणू लागले. मोदी मोदी च्या घोषणा त्यांच्या भाषणाच्या मंचाखालून इतक्या तारस्वरात दिल्या जाऊ लागल्या की त्याचे पडसाद देशाच्या कानाकोपर्‍यात ऐकू येऊ लागले. या देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्‍नांच्या मूळाशी या देशातील मुसलमान नावाचा समाज आहे, हे गृहितक जाणिवेत, नेणिवेत खोलवर रूजवण्यात संघ परिवाराची 90 वर्षांची मेहनत होतीच. त्यातच काँग्रेस नावाच्या संधीसाधूंच्या घोळक्यात निर्नायकी माजली होती. सोनिया गांधी यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. राहूल गांधी केवळ अपरिपक्वच नव्हे तर पप्पू या कॅटेगरीत जाऊन बसले होते. काँग्रेसमधील दुसर्‍या क्रमांकाचे पाच-पन्नास नेते हिंदुस्तानची गादी काही काळापुरती का होईना आपल्या ताब्यात येईल यासाठी आपल्याच पक्षाविरुद्ध व पक्षातील स्पर्धकांविरुद्ध वेगवेगळे राजकीय पेच रचण्यात मग्न होते. अण्णा हजारे नावाच्या साधू म्हणवून घेणार्‍याने त्याचवेळी नेमकी संधी साधली व आपला ॠनगरी’ बाणा दाखवत थेट लाल किल्ल्याच्या तटबंदीला भगदाड पाडायला सुरुवात केली होती. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर मोदी आल्यानंतरचा तो उन्माद अजूनही कुणी विसरू शकत नाही. नॉस्त्रोदॅमस का कुणी तरी पाश्‍चिमात्य ज्योतीषाने काही शे वर्षांपूर्वी मोदी येण्याचे भाकितच केले होते, याचे सज्जड पुरावे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकांवरून दणादण फिरू लागले होते. आता पुढची 25 वर्षे दुसर्‍या कुणी देशाची गादी बळकावण्याचा विचारच करू नका, असं छातीवर अक्षरशः मुठी ठोकून ठोकून सांगितलं जात होतं. पुढे तर मोदींचा मॅन्स फ्रायडे अमित शहा यांनी तर 50 वर्षे भाजप राज्य करणार असल्याचा घोषणा केल्या होत्या. मोदी विरोधकांच्या चेहर्‍यावरचे रंग पीडब्ल्युडीच्या रेस्टहाऊसच्या भिंतीवरील चुन्यासारखे हवेच्या झोताबरोबर पुटापुटांनी उडून जावेत, तसंच देशभरात चित्र होतं. मग असं सगळं असताना आज 2019मध्ये प्रवेश करताना तेच छप्पन इंची छातीचे महारथी नरेंद्र दामोदरदास मोदी आणि त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला इतस्ततः पसरलेले त्यांचे भक्तगण अचानक असे बचावात्मक पवित्र्यात कसे काय गेले? हा बदल केवळ पाच राज्यांतील त्यांच्या पराभवाने किंवा मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयामुळे झाला आहे, असं जर कुणी मानत असेल, तर ते 100 टक्के सत्य आहे, असं समजण्याचं कारण नाही. कारण काँग्रेस यापूर्वीही पंजाबमध्ये जिंकली होती. कर्नाटकात त्यांनी भाजपच्या घशातला घास मुत्सद्दीपणा दाखवत भाजपच्या मनी आणि मसल पॉवरची रेवडी उडवत काढून आणला होता. मग आत्ताच मोदी व भाजप नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यागत त्यांच्या कृती व त्यांची विधाने का दिसू लागली आहेत? त्याचं कारण आहे विरोधकांची देशपातळीवर होऊ पाहात असलेली महाआघाडी जी महागठबंधन या नावाने आकार घेऊ पाहते आहे.


मोदी व त्यांच्या समर्थकांना देशभरात एकत्र येत असलेल्या विरोधकांची महाआघाडी ही अपवित्र आघाडी वाटते आहे. या अपवित्रतेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोदी यांनी समाजवाद्यांच्या मांदियाळीतले धुरंधर विद्वान डॉ. राममनोहर लोहिया यांचा दाखला दिला आहे. लोहिया यांना मानणार्‍या त्यांच्या विचारांवर उभ्या राहिलेल्या या पक्षांना ते काँग्रेस पक्षाची मदत करत आहेत, हे देखील समजू नये, याची त्यांना लाज वाटू नये, असा त्यांचा दावा आहे.

डॉ. लोहिया यांनी काँग्रेसच्या सरंजामी, भांडवली व उच्च जात वर्गीय राजकारणाला विरोध केला होता. मात्र हा विरोध इतक्या टोकाला नेला होता की, हा विरोध काँग्रेसच्या शोषक जात वर्गीय हितसंबंधांकरिता नसून तो व्यक्तीगत पातळीवर वाटावा, असाच सुर त्यातून निघाला. त्यामुळेच काँग्रेसच्या विरोधात त्यांनी पहिल्यांदा देशातील पहिली बडी आघाडी केली, त्यात त्यांनी भाजपचा पूर्वज भारतीय जनसंघला सोबत घेतले होते. पुढे इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनसंघासकट लोकदल, समाजवादी पार्टी, काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेले गट-तट अशा सगळ्या खिचडीला फोडणी देऊन जनता पार्टी नावाचा पुलाव शिजवण्यात आला होता. तेव्हाही कट्टर धर्मनिरपेक्ष ते हिंदुराष्ट्राच्या निर्मितीचे स्वप्न पाहणार्‍या जनसंघापर्यंत सगळेजण काँग्रेसच्या विरोधात एकत्र येऊनही या आघाडीबाबत पवित्र-अपवित्रतेचे निकष आजवर कुणीही लावले नव्हते.
मोदी यांना एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की, या देशातील भाजपेतर पक्षांच्या मतांना एकसंध होऊ न दिल्यासच त्यांची लाल किल्ल्याच्या दिशेने होणारी वाटचाल सहज होऊ शकते. अन्यथा पानिपतच्या लढाईत कायम बलाढ्य सैन्याला छोट्या सैन्यांनी केवळ आपल्या रणनिती व धैर्याच्या आधारावर माती चारल्याचाच इतिहास आहे, हे मोदी व त्यांचे डावे-उजवे शहा-ढोवाल नीट ओळखून आहेत. त्यामुळेच तीन राज्यांमध्ये काठावर जिंकलेल्या काँग्रेसची त्यांना फार भिती वाटत नाही. त्यांना भिती वाटते आहे ती, विविध प्रश्‍नांवर एकमेकांच्या उरावर बसायला कमी न करणारे देशातील सपा-बसपा, तृणमूल-माकपा, राष्ट्रवादी-काँग्रेस, काँग्रेस-तेलगू देसम, आदी विविध पक्ष मोदी यांच्या विरोधात एकत्र येऊ पाहात असल्याची. मोदींचे अच्छे दिन काय लायकीचे होते याची प्रचिती देशातील सर्वसामान्य जनतेने गेल्या पाच वर्षांमध्ये व्यवस्थित घेतलेलीच आहे. देशातील काळ्या पैसेवाल्यांना चाप लावायला नोटबंदी केली असे सांगून देशातील शे दिडशे सामान्यांचा रांगेतच उभ्या उभ्या मुडदा पाडण्याचा, कोट्यवधी रोजगार बुडवण्याचा, छोट्या व्यापार्‍यांना देशोधडीला लावण्याचा बिनडोक वावदूकपणावर जनता किती उखडली आहे हे त्यांनी पाच राज्यांमधील मतदानातून दाखवून दिलंच आहे. त्यामुळे हा असला वावदूक उद्योग पुन्हा एकदा देशात झाला तर त्याने काय हाहाकार माजेल, हे जनता पक्के ओळखून आहे. दररोज नचुकता देवापुढे हात जोडणार्‍या व संध्याकाळी हातपाय धुवून शुभंकरोती म्हणणार्‍या, हिंदू परंपरा पाळणार्‍या घरांमध्येही एखाद्याकडे समजा गोमांस सापडलेच तर जिवंत माणसाला ठेचून मारावे का, असा प्रश्‍न केला तर त्याचे उत्तर काय येणार हे मोदी भक्तांच्या डोक्यात येत नसलं तरी मोदी-शहा-ढोवल यांना त्याचे उत्तर नाही, असेच आहे, हे पक्के माहीत आहे. मात्र अशी मानवतावादी माणसे या देशात बहुसंख्येने असली तरी ती वेगवेगळ्या रंगांत, भाषांमध्ये, जातींमध्ये विखुरलेली आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांठायी असलेली एकत्रित उर्जा मोदींच्या खुर्चीला लाथ मारण्यासाठी वापरली जाणे सोपे नव्हे. हे या तिघांना माहित असल्यामुळेच, स्कील इंडिया पासून ते नोटाबंदीपर्यंत सगळ्या प्रकारच्या चुरणाच्या गोळ्या मोदी-शहा व त्यांच्या हाताखालच्या भाजपाने बिनदिक्कत जनतेच्या गळी उतरवल्या आहेत.

मात्र या गोळ्यांमुळे सुरू झालेला अतिसार आता जीवघेणा होऊ लागल्याने जनतेनेच आपापल्या नेतृत्वार दबाव टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच इतरवेळी उत्तर-दक्षिण तोंडे असणार्‍या नेत्यांनाही एकत्र येणे भाग पडते आहे. नेमका त्याचाच मोदी आणि कंपनीला त्रास होऊ लागला आहे. देशातील विरोधी मते विभागली गेली नाहीत, तर 2019 इतके वाईट वर्ष मोदींसाठी कुठलेही नसेल. एकदा का पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले, की पुढे कसली कसली शुक्लकाष्ठं वाढून ठेवली असतील, याची त्यांना कल्पना नसली तरी अंदाज नक्कीच आहे. ज्या द्वेषाच्या राजकारणाचं बीज त्यांनी पेरलं आहे, त्याला येणारी फळं ही आजच्या विरोधकांच्याही अंगणात पडल्याने त्यांनीही त्या फळांची चव व्यवस्थित चाखली आहे. त्यामुळे 2019 येतंय ते मोदींसाठी अच्छे दिन जानेवाले है, असाच धोशा लावत!!लेखक........
मिहीर पाटील
लेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्‍लेषक आहेत

Post a Comment

एकच नंबर, अप्रतिम विश्लेषण !

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget