Breaking News

सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न


पाथर्डी/प्रतिनिधी
शहरातील एका बाजारकरी व्यावसायिकाने सावकारी कर्जाच्या वसुलीच्या जाचाला वैतागत विष पिऊन आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला. सदरील घटना शहरातील जिल्हा उप रुग्णालयाच्या लगत असणार्‍या एडके कॉलनी येथे मंगळवारी दुपारी घडली. संबंधित बाजारकरी तरुणाची परिस्थिती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी नगर येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील एडके कॉलनी येथे राहणार्‍या एका बाजारकरी व्यावसायिकाने एका खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे वेळेत न दिल्यामुळे संबंधित सावकाराने चक्रव्याढ पध्दतीने व्याज लावून संबंधित बाजारकरी व्यावसायिकाला पैशाचा चांगलाच तगादा लावला होता. तसेच दहा-पंधरा दिवसांपूर्वी या सावकाराने संबंधित व्यावसायिकाला बाजारात मारहाण केल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे हा बाजारकरी तेव्हापासून तणावात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याने आज आपल्या राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औषध घेतल्यानंतर त्याला प्रथम उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. यावेळी रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला लगेच पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती आहे. दरम्यान, बुधवारी दुपारपर्यत पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची कोणतीही नोंद करण्यात आली नसून पोलीस या घटनेनंतर काय भूमिका घेतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.