Breaking News

कोयना-वांग नदींच्या संगमावरून वाळू चोरणारे किरपेचे दोघे अटकेत


कराड (प्रतिनिधी) : कोयना-वांग नदीच्या संगम परिसरातून विक्रीच्या उद्देशाने वाळू चोरणार्‍या दोघा संशयितांना शुक्रवारी मध्यरात्री रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून वाळू भरण्याचे कोरी पाटी असे साहित्य व एस्कॉर्ट कंपनीचा नंबर नसलेला ट्रॅक्टर ट्रेलर सह जप्त केला आहे. ही कारवाई कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास केली.यशवंत उर्फ सोन्या बबन पाटोळे (वय 21) व किरण अधिकराव चव्हाण (वय 23 दोघेही राहणार किरपे, ता. कराड), अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास किरपे तालुका कराड गावच्या हद्दीत वांग व कोयना नदीच्या संगमावर कोणीतरी अज्ञात व्यक्ती विक्रीच्या उद्देशाने ट्रॅक्टरमधून वाळू भरून नेत असल्याची माहिती कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांना कळवून भापकर यांनी त्यांच्या सहकारी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी किरपे येथील यशवंत उर्फ सोन्या पाटोळे तसेच किरण चव्हाण हे दोघे एस्कॉर्ट कंपनीचा नंबर नसलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेऊन आले होते. सोबत त्यांनी वाळू भरण्यासाठी खोरे व पाट्या सोबत घेऊन आले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली, असता विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीर वाळूचे उत्खनन करण्यासाठी ते त्या ठिकाणी आले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून ट्रॅक्टर ट्रॉली स व वाळू भरण्याची साहित्य हस्तगत केले. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अशोक भापकर यांच्या फिर्यादीवरून यशवंत पाटोळे व किरण चव्हाण यांच्याविरोधात बेकायदेशीर वाळू उत्खननाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार फरांदे करत आहेत.