Breaking News

विटी-दांडू विश्‍वकरंडकात आदिवासी खेळाडूंनी पटकावले विजेतेपद


काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडु येथे पार पडलेल्या विटी-दांडू (टिप- कॅट) विश्‍वकरंडक स्पर्धेत अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील पुरुष व महिला संघातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करताना विजेतेपद पटकावले आहे. काठमांडु येथे जागतिक विटी-दांडू स्पर्धेचे 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. 

स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, जर्मनी, श्रीलंका या 8 देशांनी सहभाग घेतला होता. यात भारतीय पुरुष आणि महिला संघाने यजमान नेपाळ संघाला अंतिम सामन्यात पराभूत करून सुवर्ण पदक पटकावले. भारतीय पुरुष संघाकडून खेळणारे संदीप घाणे (कर्णधार), गणेश पवार, दिलीप बांबळे, अमोल सोनवणे, तानाजी अस्वले हे 5 खेळाडू आणि महिला संघाच्या वेणू सारुक्ते , ललिता झोले, ज्योती इदे, रोहिणी लोटे, प्रियंका उभे ह्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या आदिवासी भागातील खेळाडू आहेत. या खेळाडूंना अहमदनगर असोसिएशनचे सचिव संतोष उंबरे व प्रशिक्षक वसंत उंबरे, राहुल पिचड, डॉ.अशोक धिंदळे यांचे मार्गदर्शन लाभले. 

भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, जि.प. सदस्या सुनिताताई भांगरे, शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, प्राचार्य सुनिल मालुंजकर, प्राचार्य दिलीप रोंगटे, युवा नेते अमित भांगरे, संदीप डगळे, बाबुराव अस्वले यांनी संघाचे अभिनंदन केले.