Breaking News

दिल्लीत ‘आप’, काँग्रेस लढवणार प्रत्येकी तीन जागा; यशवंत सिन्हा यांच्यासाठी एक जागा सोडणारनवी दिल्ली - एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आम आदमी पक्ष आणि काँग्रेस केवळ भाजपच्या विरोधासाठी एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांनी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांच्या वाटपाच्या वाटाघाटी पूर्ण केल्या आहेत. सातपैकी तीन जागा काँग्रेस तर तीन जागा आम आदमी पक्ष लढवणार आहे. उर्वरित एक जागा भाजपचे माजी नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक यशवंत सिन्हा यांच्यासाठी सोडण्यात येईल.

लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांच्याविरोधात महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. याच महाआघाडीचा एक भाग म्हणून दिल्लीत काँग्रेस आणि ‘आप’मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागांसाठी वाटाघाटी सुरू होत्या. दिल्लीतील लोकसभेच्या सात पैकी तीनच जागा लढविण्याचा पक्षाचा निर्णय न पटल्यामुळे दिल्लीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. दिल्लीमध्ये 15 वर्षे काँग्रेसची सत्ता होती; पण 2015 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली विधानसभेतील एकूण 70 पैकी 67 जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले, तर 3 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता.
 
काँग्रेसला गेल्या निवडणुकीत खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर दिल्ली काँग्रेसची जबाबदारी माकन यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पक्षाची जनमानसातील प्रतिमा बदलण्यासाठी मोठी मेहनत घेतली; पण आता लोकसभा निवडणुकीत ‘आप’बरोबर आघाडी करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करीत थेट प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, असे समजते. दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली आणि ईशान्य दिल्ली या मतदारसंघातून ‘आप’चे उमेदवार उभे राहतील, तर पश्‍चिम दिल्ली, वायव्य दिल्ली आणि चांदणी चौक या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार उभे राहतील. 

शीला दीक्षित प्रदेशाध्यक्ष

माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी ‘आप’शी युती करण्यास हिरवा कंदील दाखविला. अरविंद केजरीवाल यांच्याकडून पराभूत होऊनही त्यांनी काँग्रेसच्या अस्तित्त्वासाठी भाजपला पराभूत करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पराभव विसरून त्यांनी जागावाटपाला संमती दिली. आता त्यांचीच काँग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.