Breaking News

महिला शिक्षिकेला दमदाटी; जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन


भिलार (प्रतिनिधी) : महाबळेश्‍वर पंचायत समितीच्या महिला पर्यवेक्षिकेला एका राजकीय पक्षाच्या शिक्षकाने आकसाने कार्यकर्त्यांसह तिच्या कार्यालयात जाऊन धमकी व शिव्या देऊन मानसिक खच्चीकरण केले आहे. संबधीत पर्यवेक्षिकेने माझ्या जीवितास धोका निर्माण झाला असून स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याने त्या शिक्षकावर कारवाई व्हावी व मला न्याय मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे धाव घेतल्याने महाबळेश्‍वरच्या शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रकल्प पर्यवेक्षिका वैभवी विजय भोसले याना त्यांच्या कार्यालयात जाऊन एका नावाजलेल्या पक्षाचे काम करणार्‍या खरोशी प्राथमिक शाळेतील शिक्षक चंदर आनाजी सपकाळ याने काही दिवसांपूर्वी पक्षाचे कार्यकर्ते घेऊन जाऊन दमदाटी व शिव्या देत धमकावले होते. याबाबत सौ. भोसले यांनी त्या शिक्षकाविरोधात शिक्षण विभाग व पंचायत समिती प्रशासनाला लेखी व तोंडी तक्रार दिली होती. परंतू याबाबत कसल्याही प्रकारचा निकाल झाला नाही. त्यामुळे भोसले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केल्याने त्यांनी ही तक्रार महाबळेश्‍वर पंचायत समितीच्या महिला तक्रार कमिटीकडे वर्ग केली.

महाबळेश्‍वर पंचायत समिती अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीने सौ. भोसले यांना आपले म्हणणे सादर करण्याकरिता तीन बैठकांना उपस्थित राहण्याच्या पत्राद्वारे सुचना दिल्या होत्या. त्यापैकी एकही बैठक झाली नाही. याउलट काहीतरी कारण देऊन बैठका पुढे ढकलल्याचा मोबाईल मेसेज भोसले यांना दिला जात होता. बैठका न घेण्याचा फार्स सौ. भोसले यांना न्याय द्यायचा नाही? की संबंधित शिक्षकाला पाठीशी घालायचे यासाठी चालू आहे हेच गौडबंगाल समोर येत आहे. एका महिला कर्मचार्‍याला दिवसाढवळ्या धमक्या आणि मानहानीकारक वर्तन एक शिक्षकाकडून होत असूनही प्रशासन त्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असेल तर मात्र आपणाला या ठिकाणी न्याय मिळणार नाही. हे लक्षात आल्याने त्यांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे आपल्यावर झालेल्या आन्यायाचा पाढा मांडला आहे. तसेच संबंधितांवर तातडीने कारवाई होऊन आपणास न्याय मिळावा, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.