Breaking News

शिवप्रहार संघटनेसह शेतकर्‍यांची कचेरीसमोर धरणे

नगर । प्रतिनिधी -
अकोला तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पारनेर व संगमनेर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मिळावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवप्रहार संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात शिवप्रहार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संजीव भोर, संगमनेरचे सभापती शंकरराव खेमनर, संतोष वाडेकर भाऊसाहेब डोलनर, उत्तम कुदनर, बाजीराव गागरे, रावसाहेब गोळे, सुदाम सागर, भाऊसाहेब सागर, पोपट कुदनर, संपत दरेकर, सतीश पवार यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत.
यावेळी संजीव भोर म्हणाले, पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पारनेर व संगमनेर तालुक्यातील मुळा नदीकाठच्या देसवडे, मांडवे खुर्द, जांबुत खुर्द, जांबुत बुद्रुक, साकुर, पोखरी, मांडवे बुद्रुक, बिरेवाडी, हिवरगाव, जांभुळवाडी, खडकवाडी, पळशी, शिंदोडी आदी टंचाईग्रस्त गावांना मिळावे, अशी मागणी सातत्याने केली आहे. त्या अनुषंगाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत आग्रही मागणी केली होती. ती मान्यही करण्यात आली होती. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी संगमनेर येथे 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या टंचाई आढावा बैठकीत या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र आ. वैभव पिचड व माजीमंत्री मधूकर पिचड यांनी आपल्याच तालुक्यातील असलेले व येथेच नोकरी करणार्‍या अधिकार्‍यांना हाताशी धरुन खालचे चार बंधारे कोरडे ठेवण्याचे कारस्थान राबविले, असा आरोप करत या टंचाईग्रस्त गावांना पिंपळगाव खांड धरणाचे पाणी सोडावे व संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी भोर यांनी यावेळी केली.