Breaking News

माणदेशीच्या चारा छावणीतील शेतकर्‍यांना ब्लँकेटचे वाटप


म्हसवड (प्रतिनिधी) : थंडीचा कडाका वाढल्याने येथील माणदेशी फाँडेशनच्या चारा छावणीत आपल्या जनावरांसोबत वास्तव्यास आलेल्या शेकडो महिला शेतकर्‍यांना संस्थेच्या वतीने मोफत उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. दुपारी उन्हाचा चटका व रात्री कडाक्याची थंडी अशा वातावरणात चारा छावणीतील शेतकरी भरडला जात असताना माणदेशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांच्या हस्ते सुमारे 300 शेतकर्‍यांना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. 

यावेळी माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, रवी वीरकर, विजय कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते. निसर्गाच्या अवकृपेने पुन्हा छावणी सुरु करावी लागली हे खरं. मात्र छावणीतील बळीराजा जनावरांसोबत हिवाळी वातावरणात थंडीने गारठू लागल्याचे मुंबई महोत्सवामध्ये प्रभात सिन्हा यांना समजले व त्यांनी सर्व शेतकर्‍यांना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्याचे ठरवले. त्यानुसार मुंबईहून परत येताच सुमारे तीनशे शेतकर्‍यांना त्यांनी ब्लँकेटचे वाटप केले. बळीराजा जरी थंडीने गारठला तरी माणदेशीच्या उबदार ब्लँकेटने सुखावला. शेतकर्‍यांवर निसर्गाने जरी अवकृपा दखविली असली तरी माणदेशी सदैव त्यांच्यासोबत राहणार असल्याचेही यावेळी बोलताना प्रभात सिन्हा म्हणाले, माणदेशीने गतवेळच्या छावणी समाप्तीवेळी भविष्यात पुन्हा अशी वेळ येवू नये, त्यासाठी संकल्प केला होता. त्यासाठी एकूण 13 बंधारे ठिकठिकाणी बांधले. परंतू यंदा कसलाच पाऊस न झाल्याने नद्या नाले ओस पडले बंधारे सुद्धा कोरडे पडले. शासन स्तरावरून ही माण तालुक्यात दुष्काळ जाहीर केला गेला. त्यामुळे राज्यात पहिली चारा छावणी म्हसवडमध्ये सुरु करावी लागल्याच विजय सिन्हा म्हणाले.