Breaking News

शासनाला पशु संवर्धनाचे महत्त्व माहीत नाही - विखे


कोपरगाव ता/प्रतिनिधी 
शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. आपण गायीच्या रुपात देव बघतो. आपला अहमदनगर जिल्हा दुग्ध व्यवसायात अग्रेसर आहे. सरकारचे शेतकरी विरोधी धोरण व एवढ्या मोठ्या दुष्काळी परिस्थितीत आजही शेतकर्‍यांनी दुग्ध व्यवसाय टिकवून ठेवला. यावरून शेतकर्‍यांमध्ये किती सहनशीलता आहे हे दिसते. सरकारला पशु संवर्धनाचे महत्त्व माहीत नसल्याची खंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी-जवळके येथे आयोजित पशु-पक्षी प्रदर्शन मेळाव्या प्रसंगी व्यक्त केली. जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती कोपरगाव पशु संवर्धन विभाग यांच्या सहकार्याने चांदेकसारे जिल्हा परिषद गटाच्यावतीने धोंडेवाडी-जवळके येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पशु-पक्षी प्रदर्शन मेळाव्याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले म्हणाल्या की, आपण नवीन गोष्टी अवलंबित असतांना त्याच बरोबर गावठी गायी यामध्ये गिरगाय असेल यांचा विसर पडू देवू नये. आपल्याकडून चांगल्या प्रकारच्या पशुधनाचे संगोपन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. आजच्या दुष्काळी परिस्थितीत शासनाने पशु संवर्धन विभागाच्या मार्फत शेतकर्‍यांना बियाणांचे वाटप करून जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादी कॉग्रेस व काँग्रेस आघाडीकडे आल्यापासून जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य शेतकर्‍यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवीत आहे. त्या माध्यमातून पशु पालक शेतकर्‍यांना पशु पालनाविषयी अद्यावत माहिती मिळावी. आज शेतकर्‍यांच्या कोणत्याच शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकर्‍यांच्या अडचणी दूर होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक राहणीमान उंचावे यासाठी या पशु-पक्षी प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे. मागील चार वर्षापासून सरकार शेतक-यांच्या बाबतीत उदासीन आहे. शेतकर्‍यांनी एवढ्या मोठ्या दुष्काळी परिस्थितीत आपला खर्च कमी करावा असे त्यांनी आवाहन केले. 

अजय फटांगरे म्हणाले की, आशुतोष काळे यांची कामाची पद्धत व लोकप्रियता पाहता ते नक्की कोपरगाव तालुक्याचे भावी आमदार असतील याबाबत तिळमात्र शंका नाही. त्या पशु पक्षी प्रदर्शनात एकूण 295 जनावरे आले होते. यामध्ये देशी गाय, बैल जोडी, म्हैस, शेळी, मेंढी, कालवड, संकरित गाय, चॅम्पियण गाय इत्यादी जनावरांचा सामावेश होता. यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या स्मरणार्थ चॅम्पियण गाय हे बक्षीस देण्यात आले. तसेच प्रत्येक गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस पशु पालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.सदस्या सोनाली रोहमारे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, चेअरमन आशुतोष काळे, अजय फटांगरे, अनुसयाताई होन, अनिल कदम, सोनाली रोहमारे, सोनली साबळे, अशोकराव रोहमारे, सुधाकर दंडवते, कारभारी आगवण, सुनील शिंदे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, अर्जुन काळे, श्रावण आसने, पूर्णिमा जगधने, रोहिदास होन, राहुल रोहमारे,डॉ. सुनील तुंबारे, डॉ. वाकचौरे, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.