Breaking News

विरोधात बातम्या देणार्‍या प्रसारमाध्यमांना सरकारकडून लक्ष्य : अजित पवार


रत्नागिरी : पीक विमा योजना म्हणजे राफेलपेक्षा मोठा घोटाळा आहे, अशी बातमी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी दिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वींच ही बातमी प्रसिद्धी झाली. परंतु ती वृत्तपत्रांनी उचलून धरली नाही. कारण बातमी न देण्याचा वृत्तपत्रसमूहांचा उद्देश नव्हता, तर मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवला तर तुमचे वृत्तपत्र, टीव्ही चॅनल बंद करू अशी धमकी दिली जाते. त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाच यांनी लक्ष्य केले आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.

खेड येथेक्ष झालेल्या परिवर्तन निर्धार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्याच्या गृह खात्यावर खूप मोठा दबाव आहे. यापूर्वी स्व.आबा पाटील, जयंत पाटील यांच्याकडे हे खाते होते, त्यावेळी असा दबाव नव्हता. परंतु विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे कारभार सुरू केला आहे. सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या सभेदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांना झेंडे दाखवू नका, नाहीतर कारवाई करावी लागेल असा सज्जड दम देण्यात आला. तुम्ही कोणाकोणाची तोंडे बंद करणार आहात, असा सवाल करीत येणार्‍या निवडणुकीत शिसेना-भाजप युतीच्या सरकारला घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन पवार यांनी केले. शिवसेनेला या कोकणाने खूप काही दिले. परंतु शिवसेनेने कोकणी जनतेला काही दिले नाही. केंद्रीय मंत्री अनंत गीतेंकडे असलेले अवजड उद्योग खाते यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होते. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात सीएसआरच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणला. त्यांनी त्या पदाचे सोने केले. परंतु सहावेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या अनंत गीतेंनी काहीही केले नाही. याचा विचार मतदारांनी करावा. हवा बदलत आहे, हे पाच राज्याच्या निवडणुकांनी दाखवून दिले आहे, असेही पवार म्हणाले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, देशाला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून पंतप्रधान मोदींनी सर्वांना फसविले आहे. एकही आश्‍वासन त्यांनी पाळले नाही. यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत, अन्यथा पेट्रोलने शंभरी गाठली असती. त्यामुळे त्यांना आत्ता याची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. राज्यातील कायदा आणि सुवव्यवस्था बिघडली आहे. त्यांचा थेट परिणाम कोकणच्या पर्यटनावर होऊ लागला आहे, असा आरोप आ. भास्कर जाधव यांनी यावेळी केला. ते म्हणाले, गेल्या साडेचार वर्षांत कोकणात अनेक खून झाले. राज्याचे गृहखाते मुख्यंमत्र्यांकडे असून त्यांचा वचक राहिलेला नाही. गेल्या काही दिवसांत चिपळूण येथे रामदास सावंत, खेड येथे अंकिता जंगम, अंकिता चव्हाण, गुहागरमध्ये सकपाळ बंधू यांचा खून झाला. या घटनांमुळे भयभीत झालेल्या पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवायला सुरवात केली आहे. परंतु अद्यापही या सार्‍या घटनांमध्ये आरोपी हाती लागलेले नाहीत. रेशनकार्डधारकांना धान्य मिळत नाही. शिधावाटप केंद्रावरील पॉस मशिनला रेंज मिळत नाही. रॉकेल हवे असले तर तहसीलदारांकडे रांग लावावी लागते. अशा विविध अडचणींमुळे सर्वसामान्य माणसाची पिळवणूक होत आहे. त्यामुळे या सरकारला खाली खेचणे गरजेचे आहे. छगन भुजबळ यांनीही केंद्र आणि राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. आपण न केलेल्या घोटाळ्यात आपल्याला या सरकारने अडकवले, असेही ते म्हणाले.