Breaking News

चैतन्यप्रसाद वाचनालयाच्या ग्रंथ प्रदर्शनास टेंभूत प्रतिसाद


कराड (प्रतिनिधी) : टेंभू (ता. कराड) येथे चैतन्यप्रसाद मोफत वाचनालयाचे स्थलांतर, नामफलकाचा अनावरण समारंभ व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच युवराज भोईटे, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या अर्चना गायकवाड व आदरणीय पी. डी. पाटील सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील, तर प्रमुख व्याख्याते म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी विषय संघटनेचे अध्यक्ष प्रा. दादाराम साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्रेयस पाटील यांची परीक्षेतून इंडियन आर्मीत लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल, तर पंकज हुलवान यांची स्पर्धा परीक्षेतून सहाय्यक रासायनिक विश्‍लेषक राजपत्रित अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल आणि सुप्रिया पाटील हिची तर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ कार्यशाळा अधिक्षकपदी निवड झाल्याबद्दल तसेच विजय मोहिते यांचा इंडियन आर्मीतून निवृत्त झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रा. दादाराम साळुंखे म्हणाले, शाळा, महाविद्यालये व ग्रंथालये यामध्ये काम करणारा ग्रंथपाल याला समाजात सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. कारण ज्ञानाचा खरा खजिना त्याच्यांकडे आहे. ग्रंथपाल हाच खरा पुस्तकांवर प्रेम करणारा माणूस आहे. ग्रंथलयांची अवस्था पाहिली तर ग्रंथालयातील कर्मचार्यांच्यामुळेच अत्यंत बिकट परिस्थितीतही ग्रंथालये आज सुरू आहेत. इतिहासातून नवी पिढी निर्माण होते. ग्रंथ हेच सर्वात मोठे आपले गुरू आहेत. वाचनानेच समाज सुसंस्कृत होवू शकतो. भारताची संस्कृती हजारो वर्ष टिकली कारण मागील पिढी पुढील पिढीसाठी काही तरी ठेवून गेली. आपल्या संस्कृतीचा अभ्यास अनेक देश करत आहेत आणि अनुकरणही करत आहेत. ग्रंथालयांना उर्जीतावस्था मिळवून देण्यासाठी सरकारनेही सहकार्य केले पाहिजे.
यावेळी शामराव नांगरे यांनी ग्रंथालयाची स्थापना, सध्यस्थिती व पुढील वाटचालीबाबत माहिती दिली. यावेळी सुहास महाडीक यांचेही भाषण झाले. यावेळी टेंभू विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मोहनराव बाबर, ग्रामपंचायत सदस्य, गोपाळ गणेश आगरकर हायस्कूलचे मुख्याध्यापक फैय्याज संदे, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक, अंगणवाडी शिक्षिका यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नागरगोजे यांनी केले. आभार प्रदर्शन दादासाहेब पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल शाहिर नांगरे, मिना नांगरे यांनी केले.