Breaking News

चेतेश्‍वर पुजाराची कसोटी क्रमवारीत तिस-या स्थानी झेपनवीदिल्लीः ऑस्ट्रेलिया दौर्‍यात दमदार कामगिरी करणार्‍या चेतेश्‍वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे, तर युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या क्रमवारीत तब्बल 21 स्थानांची सुधारणा झाली आहे. ऋषभ पंतने कसोटी फलंदाजांच्या यादीत 17 वे स्थान प्राप्त केले आहे. 


आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 922 गुणांसह विराट कोहली अव्वल स्थानी आहे, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दुसर्‍या स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात तब्बल 521 धावांची टांकसाळ उघडणार्‍या पुजाराच्या खात्यात 881 गुण जमा झाले असून त्याला तिसरे स्थान मिळाले आहे. सिडनी कसोटीत पुजाराने 193 धावांची तडफदार खेळी साकारली, तर 21 वर्षीय ऋषभ पंतने नाबाद 159 धावांची खेळी साकारून सर्वांची मने जिंकली. ऋषभ पंत अल्पावधीतच कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 17 व्या स्थानी पोहोचला आहे. ऋषभने या स्थानासह कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीच्या भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत उल्लेखनीय स्थान मिळवणार्‍या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये आता ऋषभचाही समावेश झाला आहे. याआधी फारुख इंजिनिअर यांनी 1973 साली कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 17 वे स्थान प्राप्त केले होते. ऋषभच्या खात्यात सध्या 673 गुण आहेत. भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला मिळालेले हे आजवरचे सर्वाधिक गुण आहेत.