Breaking News

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व जागा काँग्रेस लढवणार


लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात शनिवारी महाआघाडीची घोषणा झाल्यानंतर लगेच रविवारी काँग्रेसनेही उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागा लढविणार असल्याची घोषणा केली आहे. 

काँग्रेसने भाजपला टक्कर देण्यासाठी उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे; मात्र भाजप विरोधातील जर कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षाने युतीसाठी हात पुढे तर त्यांच्यासाठी काँग्रेसचा दरवाजा खुला आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशात सप, बसप आणि काँग्रेस महाआघाडी करणार होते; मात्र काँग्रेसला बाजूला ठेवत सप- बसपने आघाडी केली. त्यानंतर लगेच काँग्रेसने स्वबळावर सर्व जागा लढविण्याची घोषणा केली. उत्तर प्रदेशात काँग्रेसने 2009 मधील लोकसभा निवडणुकीत 21 जागा जिंकल्या होत्या. आता आगामी निवडणुकीत या तुलेनत दुपटीने जागा जिंकू, अशी आशा आझाद यांनी व्यक्त केली आहे.
आम्हाला उत्तर प्रदेशात भाजपविरोधात महाआघाडी झालेली हवी आहे; मात्र कोणाला ही महाआघाडी नको असेल, तर काही होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सप- बसपच्या आघाडीवर बोलताना ते म्हणाले, की राष्ट्रीय पातळीवर सर्व धर्मनिरपेक्ष पक्षाचे काँग्रेस स्वागत करत आहे.