Breaking News

अग्रलेख- महिलांचे धाडसी पाऊल


सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्या त्या वेळी कर्मठांनी विरोध केला. महिलांच्या मंदिर प्रवेशाचे राजकारण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या बाबत मुलाखतीत प्रश्‍न विचारला, तेव्हा त्यांनीही घटनात्मक मूल्यापेक्षा धार्मिकतेला जास्त महत्त्व दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तर सर्वोच्च न्यायालयालाच जणू सुनावले, की ज्या निर्णयाची अंमलबजावणी करता येईल, असेच निर्णय द्या. याचा अर्थ न्यायालयांनी पुरावे, राज्यघटना यांचा विचार न करता फक्त धार्मिक मूल्यांचा विचार करावा, असा होतो. ही सर्व पुरुषी मानसिकतेची लक्षणे आहेत. धर्म, जात, पात, प्रांत, लिंग अशा कोणत्याही भेदाच्या नावाखाली भेदाभेद करता येणार नाही, असे राज्यघटना सांगत असली, तरी ज्या घटनेनुसार मोदी सरकार कारभार करीत असले, तरी मोदी सरकार शबरीमला मंदिराच्या प्रवेशाबाबत मात्र मोदी सरकार घटनेच्या विसगंत कारभार करीत आहे. मंदिर प्रवेशाचा प्रयत्न अनेक महिलांनी केला; परंतु त्यात त्यांना अपयश आले होते. मंगळवारी मात्र दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश करून दर्शनही घेतले. महिलांनी मंदिर प्रवेश केला, म्हणजे आभाळ कोसळले असे नव्हे; परंतु मध्ययुगीन मानसिकतेच्या लोकांना ते कोण समजावून सांगणार? मोदी सरकारमधील एक महिला मंत्रीच देशात 33 कोटी देव असताना फक्त शबरीमला मंदिरात जाऊन महिलांनी दर्शनासाठी जाण्याची आवश्यकता काय, असा सवाल करून त्यांनीही आपली पुरुषी वर्चस्ववादाची मानसिकता दाखवून दिली. शबरीमला मंदिरात दहा ते पन्नास वर्षे वयाच्या महिलांना दर्शन घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र असतात, ही मध्ययुगीन मानसिकता घेऊन मंदिर प्रवेशाची बंदी घालण्यात आली आहे. वास्तविक मासिक पाळी आणि वंशवेलींचा जवळचा संबंध असताना मासिक पाळी अपवित्र कशी असू शकते, याचे समर्पक उत्तर प्रवेशविरोधक देता आले नाही. 

ही पार्श्‍वभूमी असताना सुमारे 40 वर्षीय दोन महिलांनी बंदी झुगारुन मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करुन दर्शन घेतले. बिंदू आणि कनकदुर्गा या क्रांतिकारी महिलांनी मध्यरात्रीपासून मंदिराच्या पायर्‍या चढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या महिलांसोबत काही पोलिस आणि अधिकारी होते; मात्र महिलांनी मंदिर प्रवेश करताच मंदिर प्रशासनाने शुद्धीकरणासाठी मंदिर बंद केले. शबरीमला महिलांना या मंदिरामध्ये शेकडो वर्षांपासून बंदी आहे; पण ही बंदी अन्यायकारक आणि भेदभाव करणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केले होते; मात्र स्थानिक आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळे या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. तिथल्या राज्य सरकारने पोलिस बंदोबस्त ठेवून महिलांना मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला; पण तोही असफल झाला. मंदिर प्रशासनाने विरोधाची भूमिका कायम ठेवल्यामुळं आणि हिंदुत्वाद्यांच्या आक्रमकतेमुळे सरकारला जबरदस्ती करण्यातही अडचणी आल्या;.पण आज हे सारे गळून पडले. पहाटे पावणेचार वाजता क्रांती घडली आणि दोन महिलांनी मंदिरात प्रवेश केला. शबरीमालाच नाही, तर देशात अनेक मंदिरे आहेत जिथे परंपरेनुसार पुरुषांना प्रवेश नाही. तिथे त्याचं पालन केले जाते. त्याबाबत कोणाला आक्षेप नाही. जर लोकांची श्रद्धा असेल, की शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जाऊ नये, तर त्याबाबत काळजी घ्यायला हवी. महिला न्यायमूर्तींनी शबरीमाला मंदिराबाबत जे भाष्य केले आहे, ते लक्षात घ्यायला हवे,’’ असे मत मोदी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले होते. त्यावरून मोदी यांची पुरुषी मानसिकता लक्षात येते. शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशबंदीप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. त्यानुसार शबरीमाला मंदिरात कोणत्याही वयाच्या महिलेला प्रवेशापासून रोखू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. महिला न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी मात्र महिलांना शबरीमाला मंदिर प्रवेश देण्यास विरोध केला होता. त्याचेच आता भांडवल केले जात आहे.
शबरीमला मंदिरात 23 डिसेंबर रोजी 11 महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र या महिलांचा प्रयत्न कट्टरवाद्यांनी हाणून पाडला होता. 10 ते 50 वर्षापर्यंतच्या या महिला भगवान अयप्पांच्या दर्शनासाठी पंबा शहरात पहाटे 5.30 वाजता पोहोचल्या होत्या; मात्र त्यांना मंदिरात जाऊ दिले नव्हते. भगवान अयप्पा ब्रह्मचारी होते त्यामुळे महिलांना या मंदिरात प्रवेशबंदी होती. मासिक पाळीमुळे महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मुख्यमंत्री पी विजयन यांनी ज्या महिलांना दर्शन घ्यायचे आहे, त्यांना पोलिसांनी संरक्षण पुरवण्याचा आदेश दिला आहे. दुसरीकडे शुद्धिकरण विधीसाठी मंदिर समितीकडून दर्शन बंद करण्यात आले आहे. दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे मंदिर समितीकडून मंदिरात शुद्धिकरण करण्यात आले. बिंदू आणि कनकदुर्गा नावाच्या दोन महिलांनी भगवान अयप्पांचे दर्शन घेतले. आतापर्यंत पोलिस बंदोबस्त असतानाही महिलांना भाविकांच्या तीव्र विरोधामुळे दर्शन घेता आले नव्हते. आता मात्र परंपरावादी भाविकांना चुकवून दोन पोलिसांसह जाऊन महिलांनी ही क्रांती केली. शबरीमाला मंदिरात महिलांना केवळ शारीरिक कारणास्तव प्रवेश नाकारणे हा पुरुषी मानसिकतेचा भाग असून ती बाब कायदेशीर म्हणता येणार नाही. भक्तीत कुठेही पक्षपाताला स्थान नसते. भक्तिमार्गातही असमानता येणार असेल, तर ते अयोग्य आहे. मंदिराच्या मंडलाला कलम 26 मुळे धार्मिक कामकाज कसे चालवावयाचे याचे स्वातंत्र्य असल्याचा मुद्दा न्या. मिश्रा यांनी फेटाळला. अय्यपन नावाचा काही वेगळा गट नाही. प्रत्येक हिंदू मंदिरात जातो. अयप्पाची इतरही मंदिरे आहेत, तेथे असा प्रतिबंध नाही. त्यामुळे अय्यपन असा वेगळा काही गट नाही व या मंदिराला वेगळा निकष लावता येणार नाही. केरळमधल्या शबरीमला मंदिराच्या गाभार्‍यात दोन महिलांनी प्रवेश करून दर्शन घेतल्याची घटना विनाशकारक असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली. सध्या 21 वे शतक चालू असले, तरी हा पक्ष कसा मध्ययुगीन मानसिकतेचा आहे, हे त्यावरून लक्षात यायला हवे. महिलांना समानतेचा हक्क देण्यापासून हा पक्ष हात झटकत असले, तर देशात लोकसंख्येत पन्नास टक्के असलेल्या महिलांनी भाजपच्या विरोधात मतदान करून या पक्षाला धडा शिकवला, तरच त्याची मानसिकता बदलेल. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळण्याची घेतलेली भूमिका काौतुकास्पद आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनीही प्रार्थना करायचा अधिकार असला, तरी पवित्र स्थळाचा अपमान करायचा आपल्याला अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. महिलांचा मंदिर प्रवेश हा हिंदू धर्मासाठी विनाशकारी घटना नक्कीच नाही. त्याचे कारण हिंदू धर्मांत यापूर्वी अनेक सामाजिक सुधारणा होताना असा विरोध झालाच होता; परंतु भाजप आता म्हणतो तसे विनाशकारी पाऊल असल्याचे कोणत्याच पक्षाने म्हटले नव्हते. आता महिलांनी उचललेले पाऊल भाजपसाठी विनाशकारक ठरेल, का हे कळण्यासाठी मात्र काही काळ जाऊ द्यावा लागेल.