Breaking News

युवकांनी योगदान द्यायला शिकावे : सिंधूताई सपकाळ यांचे आवाहनसिंदखेड राजा,(प्रतिनिधी): सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले सोबत स्वतः महिलांना शिक्षण देण्याचे महान कार्य केले. तर आमच्या जिजाऊंनी पोटचा गोळा देशासाठी देऊन मोलाचे योगदान दिले आहे. म्हणून आपणही योगदान द्यायला शिकण्याची गरज आहे, असे आवाहन सिंधूताई सपकाळ यांनी सावित्री जिजाऊ जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना केले. सिंधूताई सपकाळ पुढे बोलताना म्हणाल्या की, बापाची गरिबी झाकण्यासाठी मुलीचा जन्म आहे.

तर देशाची वेदना झाकण्यासाठी महिलांचा जन्म आहे. म्हणून महिलांची व मुलींची काळजी घ्या. माती, नीती आणि संस्कृती हातात हात घालून चालत येते आणि याच महाराष्ट्रात जिजाऊंचा जन्म झाला. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षण म्हणजे विद्या विनयेन शोभते. शिक्षणाने अंगात ताकद व ऊर्जा निर्माण करा आणि या शिक्षणाचा वापर देशासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या देशासाठी देशाच्या विकासासाठी पत्रकारांचे योगदान खूप मोठे आहे. कुठलाही घटना घडताच विना संरक्षण सर्वात पहिले पोहोचणारे पत्रकार व छायाचित्रकार आहेत. तसेच पत्रकारांनी बायकोची काळजी घ्यावी, अशी कळकळीची विनंती सुद्धा त्यांनी केली. या वेळी मुख्यमंत्री यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे सावित्री सृष्टीची घोषणा केली. सावित्री सृष्टीसाठी झटणारे दीपक ठाकरे व संतोष खांडेभराड यांचा अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी शाल, श्रीफळ व जिजाऊ प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी नगराध्यक्ष अँड नाझेर काझी, उपनगराध्यक्ष सीमा शेवाळे, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, माजी नगराध्यक्ष सीताराम चौधरी, माजी नगराध्यक्ष नंदाताई मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष राजू अप्पा बोंद्रे, मुख्याधिकारी एच. डी. वीर, नगर सेविका छबाबाई जाधव, डॉ. सविता बुरकुल, द्रोपदाबाई ठाकरे, गफ्फार मेंबर, शिवाजी राजेजाधव, पूनम राठोड, डॉ. मुरलीधर शेवाळे, प्रवीण गिते, सिद्धू जाधव, शेख यासीन, एल.एम उसरे,टेकाम, एल. आर. मेहेत्रे, शिवलाल तायडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मेहेत्रे यांनी केले.