Breaking News

कोरेगाव-पुसेगाव मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार


कोरेगाव (प्रतिनिधी) : कोरेगाव-पुसेगाव मार्गावर गोळेवाडी गावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर त्याच दुचाकीवरील अन्य दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत.

 याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गोळेवाडी गावच्या हद्दीत उदय अधिक माने (वय 27) व त्याचे मित्र महेश बाळासाहेब माने, अमित विलास कांबळे (सर्व रा. भोसे, ता. कोरगाव) हे स्प्लेंडर दुचाकीवरून (एमएच 11 बीई 3621) कोरेगावच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पुसेगावच्या दिशेने निघालेल्या एका मोटारसायकलने ऊसवाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉलीस ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही दुचाक्या समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. 

त्यात उदय अधिक माने ऊसाच्या ट्रॉलीखाली सापडून जागीच ठार झाला. त्याचे मित्र महेश माने व अमित कांबळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघाताची नोेंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरिक्षक मिसळे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सातारा-पंढरपूर मार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे ऊसवाहतूकीमुळे या मार्गावरील प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.