Breaking News

कैद्यांना मिळणार आता पावभाजी, खीर आणि छोले भटुरे!


नवीदिल्लीः तरुंगातील जेवण म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर सिनेमात दाखवतात, त्याप्रमाणे जर्मन धातूच्या पांढर्‍या रंगाच्या ताटांमध्ये वाढलेली भाजी, चपात्या आणि भात असा मेन्यू डोळ्यासमोर येतो; मात्र आता लवकरच तिहार तुरुंगामधील कैद्यांना चविष्ट जेवण मिळणार आहे. कैद्यांना पावभाजी, बदामी पुरी, छोले भटुरे, खीर, मलाईचाप असे वेगवेगळे चविष्ट पदार्थ देण्यात येणार आहे. 

तिहारमधील तुरुंगातील कैद्यांनी अनेकदा त्यांना देण्यात येणार्‍या अन्नपदार्थांच्या दर्जासंदर्भात तक्रार केली होती. अनेकदा कैद्यांनी तुरुंग अधिकार्‍यांना सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीन वेळेस देण्यात येणारे जेवण बेचव असल्याची तक्रार केली होती. याच सततच्या तक्रारींची दखल घेत तुरुंग प्रशासनाने कैद्यांना वेगळे पदार्थ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता कैद्यांना पावभाजी, बदामी पुरी, छोटे भटुरे, खीर, मलाईचापसारखे चविष्ट पदार्थ चाखता येणार आहेत. एक जानेवारीपासून हे पदार्थ कैद्यांना देण्यास सुरुवातही झाली आहे. या नवीन बदलामुळे कैदी समाधानी असल्याचे तुरुंग अधिकार्‍यांनी सांगितले आहे. नवीन पदार्थांची चव आणि दर्जा कैद्यांना आवडला असून त्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

तुरुंग प्रशासनाने पोलिस अधीकक्षकांना आठवड्याचा मेन्यू आधीच ठरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात आपल्याला कोणते पदार्थ खायला मिळणार आहेत, हे कैद्यांना आधीच समजणार आहे. आधी कैद्यांना सकाळचा नाश्ता म्हणून चहा आणि दोन बिस्कीटे दिली जायची; पण आता नवीन नियमानुसार अधिक चांगला नाश्ता कैद्यांना देण्यात येणार आहे.