Breaking News

आंदोलनाचा परिणाम; वडूजमधील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पासचे वाटप


वडूज (प्रतिनिधी) : खटाव तालुक्यातील वडूज हे दुष्काळी मंडलांच्या यादीत असून येथील विद्यार्थ्याना आज येथील सामाजिक कार्यकर्त्यांसह नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळातर्फे एसटी महामंडळाकडून मोफत एसटी बस पासेस वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, अंकुश दबडे, आगारप्रमुख विकास माने, सातेवाडीचे सरपंच हणमंत बोटे, धनंजय क्षीरसागर, मधुकर मोहिते, अक्षय थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती. 



येथील सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्रमंडळ व शालेय विद्यार्थी यांनी काही दिवसापूर्वी मोफत पास मिळत नसल्याच्या निषेधार्थ येथील बसस्थानकात काही काळ एसटी बसेस रोखत ठिय्या आंदोलन केले होते. या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाकडून आज दुष्काळग्रस्त विद्यार्थ्याना आंदोलनकर्त्यांच्या हस्ते पास देण्यात आले. यावेळी श्याम जगदाळे, अनिकेत यवतकर आदी उपस्थित होते.