Breaking News

रस्त्याचे निकृष्ट काम सोनगाव ग्रामस्थांनी पाडले बंद


शेंद्रे (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील सोनगाव ते आसनगाव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे शिवाजीनगर व शेळकेवाडी गावच्या हद्दीत सुरू असणारे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून या परिसरातील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले व बांधकाम विभागाचे अधिकारी जोपर्यंत काम सुरू असलेल्या ठिकाणी कामाची पाहणी करून झालेल्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी येत नाहीत व संबंधित ठेकेदारास ठोस सूचना करत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून सोनगाव- आसनगाव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम शिवाजीनगर, शेळकेवाडी गावच्या परीसरात सुरू झाले आहे. परंतू या रस्त्याच्या खडीकरणावेळी रस्त्यावर टाकण्यात येणारे डांबराचे प्रमाण खूपच कमी असल्याचे तसेच या रस्त्यावर पुर्वी असणारे खड्डे व्यवस्थित न भरता त्यामध्येच तशीच खडी टाकली जात असल्याचे, व रस्त्यासाठी वापरण्यात येणारी खडीही मोठ्या आकाराची वापरत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी बुधवारी सकाळी ते काम बंद पाडले. अशा प्रकारच्या कामामुळे सदरहू रस्ता एक वर्षसुद्धा टिकणार नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संबंधित कामाची योग्य तपासणी केल्याशिवाय हे काम सुरु केले जाणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

शेळकेवाडीचे सरपंच संतोष शेळके, शिवाजीनगरचे सरपंच शत्रृघ्न धनावडे, संभाजी शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन कदम,प्रविन शेळके, सुधीर शेळके तसेच शेळकेवाडी, शिवाजीनगर, भाटमरळी येथील ग्रामस्थांनी निवेदनावर सह्या केल्या.