Breaking News

इंदिराजी सर्वांत सक्षम नेत्या नितीन गडकरी यांच्याकडून स्तुतीसुमने; भाजपच्या विचारधारेपेक्षा वेगळे वक्तव्य

Image result for नितिन गडकरी


नागपूर/ प्रतिनिधीः
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या त्यांच्या काळातील सर्वात सक्षम नेत्या होत्या, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. भाजपच्या विचारधारेपेक्षा वेगळे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

नागपूरमध्ये झालेल्या स्वयंसेविकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी स्वयंसेविका संबंधित असतात. त्यामुळे संघ परिवारातच गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आले आहे. या वेळी त्यांनी स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण देताना इंदिरा गांधी यांचे नाव घेतले. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या बळावर सत्ता काबीज केली. त्या त्यांच्या काळातील अनेक पुरुष नेत्यांपेक्षाही सक्षम नेत्या होत्या, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. अर्थात यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनीही इंदिरा गांधी यांचा दुर्गा असा उल्लेख संसदेत करून त्यांचा गौरव केला होता. बांगलादेशच्या निर्मितीनंतर वाजपेयी यांनी असे कौतुकोद्गार काढले होते.

इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये आणीबाणी लादली. त्याकाळात भाजपशी संबंधित अनेकांना तुरुंगात जावे लागले होते. त्यामुळे भाजपचे नेते इंंदिरा गांधी यांच्यावर सातत्याने टीका करीत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही त्याला अपवाद नाहीत. इंदिरा गांधी यांच्या योजनांना नावे ठेवत असतात. या पार्श्‍वभूमीवर गडकरी यांचे वक्तव्य राजकीय चर्चेला निमंत्रण देणारे ठरले आहे. भाजपने कायमच इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या निर्णयावरही टीका केली आहे. 1975 ते 1977 या काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. हा काळ म्हणजे देशातला सर्वांत कठीण काळ होता. इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली, असा आरोप कायमच मोदी आणि भाजपचे इतर नेते करीत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित कार्यक्रमात गडकरी यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी चार शब्द कौतुकाचे काढणे हे काही भाजपच्या नेत्यांच्या वर्मी लागल्यासारखे झाले आहे.

कोणत्याही आरक्षणाशिवाय इंदिरा गांधी यांनी स्वतःला सिद्ध केले होते. त्यांची कारकीर्द निश्‍चितच वाखाणण्याजोगी आहे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. मोदी जे बोलतात आणि पक्षाची जी भूमिका आहे, त्याच्या विरोधातले वक्तव्य गडकरी यांनी केले आहे. त्यातून त्यांना काय साधायचे आहे, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

केंद्रीय नेत्यांविरोधातले वक्तव्य

गडकरी यांनी गेल्या महिन्याभरात तीनदा सध्याच्या नेतृत्त्वाच्या विरोधात अप्रत्यक्ष टीका केली आहे. नेतृत्व यशाचे जसे श्रेय घेते, तसेच अपयशाचेही घ्यायला हवे, असे पुण्यातील बँकांच्या पुरस्कार वितरणात गडकरी म्हणाले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले होते; परंतु त्यानंतर दिल्लीतील एका कार्यक्रमात त्यांनी थेट मोदी-शाह यांनाच अप्रत्यक्ष लक्ष केले होते. तिथेही खासदारांच्या वाईट कामगिरीची जबाबदारी पक्षनेतृत्त्वाचीच असल्याचे म्हटले होते.