Breaking News

जांभा दगड वाहतुक; साडेपाच लाखांचा दंड


महाबळेश्‍वर (प्रतिनिधी) : गौण खनिज वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गौण खनिजाची बेकायदा वाहतूक करणारे पाच ट्रक मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान तहसीलदार मीनल कळसकर यांनी पकडले. या पाच ट्रक मालकांना पाच लाख 65 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

दि. 8 रोजी महाबळेश्‍वरच्या तहसीलदार शासकीय बैठकीसाठी वाई येथे गेल्या होत्या. तेथून रात्री परत येत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण येथून 9 ट्रक जांभा दगड भरून ते महाबळेश्‍वर मार्गे पुढे जाणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे एक लिपिक व एक शिपाई असे दोन कर्मचारी घेऊन तहसीलदार मीनल कळसकर यांनी मध्यरात्री 12 वाजता महाड नाका येथे पोलिसांच्या मदतीने सापळा लावला. दीड वाजण्याच्या सुमारास एका मागून एक ट्रक येऊ लागले. अर्ध्या तासात पाच ट्रक आले, तसे ते पकडण्यात आले. ही खबर घाटात असलेल्या अन्य चार ट्रकचालकांना मिळाली. त्यांनी ते ट्रक घाटात एका ढाब्यावर थांबवले. पकडलेले पाच ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले. 

गौण खनिजाची वाहतूक सूर्योदय ते सूर्यास्त याच दरम्यानच करावयाची असते. अशी याबाबत नियमावली आहे; परंतु नियम डावलून गौण खनिजाची वाहतूक केल्याप्रकरणी ही करवाई करून 5 लाख 65 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

या कारवाईत एमएच 11 बीके 1661 यातून गणेश भिलारे (रा. अवकाळी) याने जांभा दगड 2 ब्रास, एमएच 08 डब्ल्यू 9567 मधून योगेश साळुंखे (रा. वाई) याने जांभा दगड 2 ब्रास, एमएच 11 एएल 4825 या गाडीतून विजय कासुर्डे (रा. तापोळा) याने जांभा दगड 3 ब्रास, एमएच 11 बीएल 6861 मधून आसिफ शारवान (रा. तापोळा) याने जांभा दगड 3 ब्रास, तर एमएच 14 सी डब्ल्यू 1241 या ट्रकमधून विलास मोरे (रा. माचुतर) याने जांभा दगड 2 ब्रास केल्याप्रकरणी अवैध जांभा दगडासह सर्व पाचही वाहने जप्त करण्यात आली. तसेच विलास मोरे, योगेश साळुंखे, गणेश भिलारे यांना प्रत्येकी 1 लाख 10 हजार 800 रुपये तर विजय कासुर्डे यांचे दोन ट्रक व आसिफ शारवान यांचा एक असा प्रत्येकी 1 लाख 16 हजार 200 रुपयांचा दंड करण्यात आला.