Breaking News

काँग्रेसला फक्त पैशाची भाषा कळते! जेटली यांची टीका; काँग्रेस-भाजपमध्ये राफेलवरून खडाजंगी


नवीदिल्लीः राफेल करारातील कथित घोटाळ्याच्या मुदद्यावरून संसदेत आज काँग्रेस-भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल करार झाल्याचा दावा करणार्‍या राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार हल्ला चढवला. ’राहुल गांधी हे खोटारडे आहेत. त्यांना देश आणि देशाच्या सुरक्षेचे महत्त्व कधीच कळणार नाही. त्यांना फक्त पैशाची भाषा समजते,’ असा घणाघाती आरोप जेटली यांनी केला. 

लोकसभेत राफेल करारावर झालेल्या चर्चेत भाग घेताना राहुल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा आरोप केले. काँग्रेसनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका ऑडिओ टेपचाही त्यांनी उल्लेख केला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडं राफेलची सर्व गुपिते आहेत, असे राहुल म्हणाले. जेटली यांनी राहुल यांचे सगळे आरोप खोडून काढले. गेल्या सहा महिन्यापासून राफेल कराराविरोधात उच्चारला गेलेला प्रत्येक शब्द खोटा आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राहुल यांचे सर्व आरोप न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अंतिम मानला जातो; मात्र राहुल न्यायालयाचाही अवमान करत आहेत. काही लोकांना सत्याचा मुळातच तिटकारा असतो, असा टोलाही त्यांनी राहुल यांना लगावला. 
मनोहर पर्रिकरांच्या वक्तव्याचा हवाला देऊन काँग्रेसने प्रसिद्ध केलेली ऑडिओ टेप बनावट आहे. त्यात अजिबात तथ्य नाही, असे सांगून जेटली म्हणाले, की राफेल विमाने ही देशाची गरज आहे. कारगील युद्धानंतर हवाई दलाने अत्याधुनिक विमानाची मागणी केली होती. त्या गरजेपोटीच ही विमाने घेतली जात आहेत. काँग्रेस आघाडी सरकारला राफेलचा करार पूर्ण करता आला नाही. त्यांनी देशाच्या सुरक्षेशी खेळ केला. राहुल गांधी यांना लढाऊ विमानातले काही कळतही नाही. त्यांना देशाच्या सुरक्षेचे महत्त्व कळणार नाही. त्यांना फक्त पैशाचा व्यवहार समजतो. राफेल करार हा दोन देशांच्या सरकारमधील करार आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केलेला करार हा यूपीएच्या करारापेक्षा 9 टक्क्यांनी स्वस्तात झाला आहे. त्यासाठी तब्बल 74 बैठका झाल्या. ऑफसेट भागीदाराची निवड दसॉल्ट कंपनीने केली आहे. काँग्रेसला या करारातील ऑफसेट क्लॉज समजलेलाच नाही.

 
एए आणि मिस्टर क्यू


राहुल गांधी यांनी संसदेत अनिल अंबानी यांचे नाव घेताना ’एए’ असा उल्लेख केला होता. त्यावर जेटली यांनी बोफोर्स व्यवहारातील दलाल क्वात्रोची याचा ’मिस्टर क्यू’ असा उल्लेख करत राहुल यांना उत्तर दिले.