भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेले पहिलेच सरकार; मोदी यांचा दावा; काँग्रेसवर मात्र घोटाळ्यांचा आरोप


नवी दिल्ली : सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकते, हे भाजप सरकारने सिद्ध केले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यादांच सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावर सुरू असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना केला.

काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी यांनी म्हटले, की याआधीच्या सरकारने देशाला अंधारात लोटले. त्यामुळे देशाची महत्वाची 10 वर्षे (2004-2014) घोटाळे आणि भ्रष्टाचाराने वाया गेली. आर्थिक दुर्बलांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिल्याने ’न्यू इंडिया’चा आत्मविश्‍वास वाढेल, असेही त्यांनी म्हटले. याआधीच्या सरकारने शेतकर्‍यांकडे केवळ मतदार म्हणून पाहिले; मात्र आमच्या सरकारने त्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. आम्ही 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला चौकशीसाठी बोलावण्यात आले. नऊ तास बसवून माझी चौकशी केली; पण काँग्रेसची फर्स्ट फॅमिली स्वत:ला कायद्यापेक्षा मोठी समजते. न्यायालयाने समन्स बजावूनही सुनावणीला हजर राहत नाही. ज्यांचा देशाच्या संस्थांवर विश्‍वास नाही ते देशाचा आदर कसा करणार ? जे जामिनावर बाहेर आहेत, त्यांचा कायदा आणि संस्थांवर विश्‍वास नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली.

काँग्रेसच्या दृष्टीने सीबीआय, कॅग, रिझर्व्ह बँक सर्वच चुकीचे आहेत. तेच फक्त बरोबर आहेत. ही संविधान आणि साम्राज्यामधली लढाई आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यांनी यंत्रणांचा वापर करून मला त्रास दिला. त्यांनी अमित शाहंनाही तुरुंगात टाकले, असा आरोप मोदी यांनी केला. अयोध्या खटल्यातही काँग्रेसने कायदेशीर प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस विरोधात जन्मलेले पक्ष आज फक्त भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेससमोर शरणागती पत्करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. आम्ही शेतकर्‍याला सशक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वामिनाथन आयोगाची शिफारस मंजूर केली. शेतकर्‍यांना खर्चाच्या दीडपट समर्थन मूल्य देत आहोत. सर्व समस्या दूर झाल्या असे मी म्हणणार नाही, असे मोदी यांनी सांगितले.
सीबीआयबाबत बोलताना मोदी म्हणाले, की आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगडमध्ये तेथील सरकारने सीबीआयवर बंदी का घातली? मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा 12 वर्षे यूपीए सरकारने सतावणूक केली, तरीही आम्ही गुजरातमध्ये सीबीआयवर बंदी घातली नाही.
याआधी अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. 
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले, की काँग्रेस देशाच्या सुरक्षेबाबत खेळ करत आहे. त्यासाठी देशाचा पंतप्रधान आता मजबूत की मजबूर हवा हे आता देशाने ठरवावे.
 
काम करणारा प्रधानसेवक हवा, की सुटीवर जाणारा?

देशाला प्रधानसेवक कसा हवा, ते तुम्ही ठरवा. रात्रंदिवस मेहनत करणारा, कष्ट करणारा, भावी पिढीचा विचार करून 18-18 तास काम करणारा प्रधानसेवक तुम्हाला हवा, की देशाला गरज असताना कधीही सुट्टीवर जाणार प्रधानसेवक हवा. ते तुम्हीच निवडा, असे आवाहन करताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. माझ्याविषयी भरपूर अपशब्द बोलले जात आहेत; पण चौकीदार थांबणार नाही, आता तर सुरुवात झाली आहे, असा इशारा त्यांनी दिला. 

भ्रष्टाचारासाठी विरोधकांना हवे मजबूर सरकार


एका व्यक्तीविरोधात सगळे एकत्र येत आहेत. विरोधकांना देशात मजबूत सरकार नको, मजबूर सरकार हवे आहे. जेणेकरून त्यांना भ्रष्टाचार करता येईल. देशाला मजबूत सरकार हवे आहे; पण विरोधकांना कुटुंब, नातेवाइकांचे भले करण्यासाठी संरक्षण डीलमध्ये दलाली खाण्यासाठी मजबूर सरकार हवे आहे, असा आरोप मोदी यांनी केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget