Breaking News

मल्हारपेठच्या शाळेत भरलेल्या बालबाजारास प्रतिसाद


पाटण (प्रतिनिधी) : बाल वयामध्येच शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञान अवगत होणे गरजेचे असून ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच होऊ शकते. पालकांनी मुलांच्या आवडीप्रमाणे व्यवहार शिकवण्याचा प्रयत्न करावा, असे मत मल्हारपेठच्या सरपंच सौ. धनश्री कदम यांनी व्यक्त केलेमल्हारपेठ (ता. पाटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बालचमूंनी शाळेच्या प्रांगणात आठवडा बाजार भरवून व्यावहारिक जगतातील मोठ्या बाजारात होणारे खरेदी विक्रीचे व्यवहार लहान वयातच अवगत होण्यासाठी बाल बाजार हा उपयोगी पडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये बाजारांमधील होणारे व्यवहारज्ञान कळावे, या उद्देशाने आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. या बाजाराला गावातील ग्रामस्थांनी आवश्क वस्तु खरेदी करून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

या बाल बाजाराचे उदघाटन शाळा समितीच्या अध्यक्षा सारिका पवार, प्रगतशील शेतकरी बबन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा समितीचे उपाध्यक्ष महेश कदम, सुषमा पवार, सुवर्णा वाकळे, चंद्रकांत भिसे, बाबूराव पवार, दादासाहेब पवार, नवनाथ चिंचकर, सुषमा चव्हाण, भाग्यश्री हिरवे यांच्यासह पालक प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बाजारामध्ये सुमारे पंधरा हजार रुपयांची उलाढाल झाली असून हा बालबाजार जणू मोठ्या आठवडी बाजारासारखाच झाल्याचा अनुभव पालकांना आल्याचे शिक्षका सरिता फल्ले, वनिता अपशिंगे, अमोल जाधव यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी सेंद्रीय बियाणे व खताचा वापर करून पिकवलेल्या भाज्या तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थांची या बालबाजारामध्ये विक्री केली.